मुंबई - माझी आई म्हणाली होती, एक वेळ राजकारण सोड पण पवार साहेबांना सोडू नको असं केज विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचे पती आणि माजीमंत्री दिवंगत विमल मुंदडा यांचे चिरंजीव अक्षय मुंदडा यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या संकल्प मेळाव्यात म्हटलं होतं. मात्र आज त्याच अक्षय मुंदडा यांच्या पत्नीने राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतरही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अक्षय यांनी बायकोच्या इच्छेखातर आईचा आदेश डावलला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली होती. यामध्ये केज मतदार संघातील उमेदवार नमिता मुंदडा यांचा समावेश होता. मात्र नमिता यांनी राष्ट्रवादीतून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
संकल्प मेळाव्यात अक्षय मुंदडा यांनी राष्ट्रवादी व शरद पवार यांच्यावर आपली अपार श्रद्धा असल्याचे म्हटले होते. मृत्यूपूर्वी आई म्हणाली होती की, एक वेळ राजकारण सोड पण पवार साहेबांना कधी सोडू नको. त्यावेळी कार्यक्रमात अनेकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. त्यांच्या त्या वक्तव्याला दोन महिनेही उलटले नसताना अक्षय मुंदडा यांच्या पत्नी आणि विमलताई मुंदडा यांच्या सूनबाई नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे आईचा आदेश डावलून अक्षय यांनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला का, असा प्रश्न मतदार संघात उपस्थित करण्यात येत आहे.
नमिता मुंदडा यांनी आज बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जबर धक्का बसला आहे.