- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंगारकीनिमित्त प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात सोमवारी रात्री १२ वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनासाठी भलीमोठी रांग लागली होती. मंगळवारी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी येथे आलेल्या भाविकांनी अत्यंत शीस्तबद्धरीत्या दर्शन घेत ‘गणपती बाप्पा मोरया...’ असा गजर सुरू ठेवला होता. दरम्यान, या वर्षी ३ वेळा अंगारकी संकष्टीचा योग आहे, त्यापैकी दुसरी अंगारकी १३ जून रोजी होती.प्रत्येक अंगारकी संकष्टीप्रमाणे या अंगारकीलासुद्धा गर्दी होणार हे ओळखून श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीने संपूर्ण तयारी केली होती. या वेळी अनेक राजकीय नेतेसुद्धा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येऊन गेल्याचे न्यास समितीकडून सांगण्यात आले आहे. शिवाय काही सेलीब्रेटीही सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाले होते. अंगारकीसाठी न्यास समितीने १२ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून भाविकांसाठी मोफत वातानुकूलित बससेवा पुरविली होती.महिला व पुरुष भाविकांना मुखदर्शनासाठी एस. के. बोले मार्गावरील आगर बाजार ते सिद्धिविनायक प्रवेशद्वारादरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून प्रवेश दिला जात होता. दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. पहाटेच्या वेळेसे रांग मोठी होती. दुपारी गर्दी कमी झाली. सायंकाळनंतर पुन्हा भाविकांच्या गर्दीत भर पडली होती.भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसर तसेच गोखले मार्गावरील पोर्तुगीज चर्चपासून ते सिद्धिविनायक मंंदिरापर्यंत पोलीस तैनात करण्यात आले होते. नाराजीचा सूर...: एरव्ही भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतात तेव्हा नारळ, हार, फुले घेऊन जातात. परंतु गर्दीचा विचार करता भाविकांना अंगारकीमुळे मंदिरात नारळ, हार, फुले श्रींच्या चरणी वाहता आली नाहीत. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी होती. दरम्यान, पूजेच्या साहित्यामुळे दर्शनाला विलंब होऊ नये म्हणून हे साहित्य नाकारण्यात आल्याचे समितीने सांगितले.