पुणे : सध्या जगभरात कोरोनासारख्या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. अशावेळी मद्यपान आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकते. मद्यपानाचा थेट संबंध न्यूमोनिया व इतर फुफ्फुसीय रोगांशी जोडलेला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, यकृत रोग व कर्करोगाचा धोका वाढण्यासह विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी मद्यपानापासून दूर राहणे आवश्यक आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मोठ्या विश्रांतीनंतर दुकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र दुकाने सुरु होताच वाइन शॉप्सभोवती प्रचंड गर्दी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गर्दी करताना अशावेळी आरोग्यविषयक नियम पाळले जात नाहीत, याकडे तज्ञांनी लक्ष वेधले आहे. मद्यपानामुळे आरोग्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आतड्याच्या रचनेमध्ये बदल होतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे समर्थन करणार्या कोट्यावधी सूक्ष्मजीवांच्या क्षमतेवर परिणाम होतो. मद्यपानामुळे आतड्यांमधील पेशींचे नुकसान होते. परिणामी जीवाणू आणि विषाणूंविरूद्ध संरक्षण देणारी पहिली फळी निष्प्रभ होते.आतड्यांमधील पेशींचे नुकसान झाल्याने विषाणूंना आपल्या रक्तप्रवाहात जाणे सुलभ होते. म्हणजेच मद्यपान करून आपण शरीराची बचावात्मक यंत्रणा कमकुवत करतो. ज्यामुळे सर्दी, विषाणू, इतर जिवाणू किंवा विषाणूजन्य संक्रमणापासून बचाव करणे अवघड होते. अगदी थोड्या काळासाठीही मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकतेअसा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे......चौकटआपली रोगप्रतिकारक शक्ती खराब झाल्याने शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. अल्कोहोल जर्नलच्या 2015 च्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, संक्रमणाच्या वेळी रक्तातील पांढर्या पेशींचे प्रमाण कमी होऊ शकते. मोनोसाइट्स म्हणून ओळखले जाणार्या पेशींचे हे प्रमाण कमी होताच तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यासाठी कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात मद्यपान टाळणे हाच उत्तम पर्याय आहे, असा सल्ला डॉ. महेश लाखे, संसर्गजन्य तज्ञ कोलंबिया एशिया हॉस्पिटल.........
लॉकडाउन ही व्यसनातून मुक्त होण्याची एक उत्तम संधी..
मनोरुग्ण-तज्ञांच्या मदतीने लॉकडाउन ही व्यसनातून मुक्त होण्याची एक उत्तम संधी होती. यासाठी डॉक्टरांनी विविध सोशल मीडियावर सल्ला देखील दिला होता. मात्र ही कल्पना लोकांना रुचली नसावी. मद्यपान आणि बेरोजगारी ही व्यसनाधीन व्यक्तींना दुहेरी हानी पोहोचू शकते. अनेक अभ्यास आणि सर्वेक्षणांद्वारे मद्यपान हे घरगुती हिंसाचार, आत्महत्या, गुन्हे आणि विविध आरोग्यविषयक गुंतागुंतांशी संबंधित असल्याचे नोंदवले गेले आहे. पुरेशी कालावधीसाठी योग्य मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेणे हाच मेंदू विकार व अप्रिय वर्तणुकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या व्यसनापासून मुक्त होण्याचा एकमात्र उपाय आहे- डॉ. राहुल बागले, शरीररशास्त्र तज्ञ