मुंबई : दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अपघातांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वाहनचालकाला दारू पिण्यापासून रोखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक नामी शक्कल लढविण्यात आली आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह रोखण्यासाठी मुंबईतील बार अॅण्ड रेस्टॉरन्टबाहेरच ५00 अल्कोबुथ बसविण्याचा निर्णय घेतला आहे. एका खासगी कंपन्यांमार्फत हे बुथ लवकरच बसविण्यात येतील, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाकडून देण्यात आली. तळीराम चालक आढळल्यास वाहतूक पोलिसांकडून दोन हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. तसेच याबाबत न्यायालयातही केस चालवून दंड आकारणी, लायसन्स जप्ती किंवा शिक्षा ठोठावली जाते. तरीही चालक दुर्लक्षच करतात. त्यामुळे बार अॅण्ड रेस्टॉरंटबाहेर पडणाऱ्या ग्राहकाला वाहन चालवण्यापासून रोखण्यासाठी अल्कोबुथ नावाची मशिनच बार अॅण्ड रेस्टॉरंटबाहेर बसविण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला आहे. दोन खासगी कंपन्यांची मदत घेऊन वाहतूक विभाग हे मशिन बसवतील. यात एक कंपनी ३00 तर दुसरी कंपनी २00 मशिन बसवणार आहे. यापूर्वी बार अॅण्ड रेस्टॉरंटकडूनच मशिन बसविण्यात येणार होते. मात्र एक मशिन बसविण्यासाठी लागणारा खर्च परवडणार नाही, असे कारण देत मशिन बसवण्याचा प्रस्ताव बार अॅण्ड रेस्टॉरंटकडून नाकारण्यात आला. त्यानंतर दोन खासगी कंपन्यांनी सामाजिक कार्य म्हणून या मशिन बसविण्याचा निर्णय घेतला. एखाद्या ग्राहकाच्या शरीरात दारूचे प्रमाण जास्त असल्यास ही मशिन त्या प्रमाणाची माहिती देईल. ग्राहकाची बार अॅण्ड रेस्टॉरंटच्या मालक-चालक किंवा कर्मचाऱ्यांकडूनच मशिनद्वारे तपासणी केली जाईल. मद्याचे प्रमाण जास्त असल्यास त्याला त्यांच्या वाहनासाठी चालक किंवा टॅक्सी सेवा उपलब्ध करून दिली जाईल. मशिन बसविण्यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि कंपन्यांकडूनच मुंबईतील बार अॅण्ड रेस्टॉरंटचा सर्व्हे करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह रोखणार ‘अल्कोबुथ मशिन’
By admin | Published: June 21, 2016 2:48 AM