अहमदनगर : येथील जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये बनावट दारु निर्मितीचा अड्डा कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी उघड झाले. जिल्हा परिषद निवडणुकीतील शिवसेना उमेदवाराने या अड्ड्यावर विकत घेतलेल्या विषारी दारूनेच दोन दिवसांत सहा जणांचा बळी घेतला आहे. पोलिसांनी छापा मारुन बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले असून तिघांना अटक केली आहे.पांगरमल येथे कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड यांनी या अड्ड्यावरून विकत घेतलेल्या दारुतून विषबाधा झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी जिल्हा रुग्णालयातील कँटीनवर छापा टाकून विविध कंपन्यांचे बूच, प्लास्टिक कव्हर, रिकाम्या बाटल्या, अल्कोहोल सदृश पदार्थांच्या बाटल्या, थिनर, चॉकलेटी फुड कलर, संत्राच्या बाटल्या असे बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी हनिफ शेख, जाकीर शेख, जितू गंभीर यांना ताब्यात घेतले आहे़ कॅन्टीन चालविणारा मोहन दुग्गल मात्र फरार झाला आहे़ (प्रतिनिधी)
नगर जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये दारुचा अड्डा!
By admin | Published: February 16, 2017 4:39 AM