गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. आज तर पाकिस्तानातून सुटलेले वादळ महाराष्ट्रावर धडकले आहे.
पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे.
मुंबई - पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफरने केली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाहीय. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे.