अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली- उरणमध्ये संशयित घुसल्याचे शाळकरी मुलांनी पाहिल्याने गेल्या दोन दिवसांपासून उरण परिसरात सुरक्षा यंत्रणांकडून सर्च आॅपरेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर घनदाट जंगल असलेल्या कर्नाळा परिसरातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी पनवेल तालुका पोलिसांनी गस्त वाढवली आहे. चोवीस तास एक पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल शहरापासून १२ किमी अंतरावर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. इसिसच्या कथित अतिरेक्यांनी या भागात रेकी केल्याचा खळबळजनक खुलासा पकडण्यात आलेल्या आरोपीने केला आहे. निर्जन स्थळ असल्याने येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा घाट इसिसने आखला होता. मात्र मुदब्बीर शेखचा साथीदार रिझवानच्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. अभयारण्यात नेमके कोण येते त्याची ओळख काय हे सांगता येत नाही. त्याचबरोबर अभयारण्याला कंपाऊंड नसल्याने कोणत्याही मार्गाने आतमध्ये प्रवेश करता येत असल्याने सुरक्षा धोक्यात होती. त्यामुळे पोलिसांनी वन विभागाच्या सहयोगाने याठिकाणी गस्त वाढवली होती. त्याचबरोबर पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी कर्नाळा परिसरातील गावांमधील सरपंच, प्रतिष्ठित ग्रामस्थांची बैठक बोलावून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. पनवेल तालुका पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून लाँग मार्च कर्नाळ्यात काढण्यात आला होता. यानिमित्ताने पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत माहिती करून घेतली.>खास पथक तैनातकर्नाळा अभयारण्य परिसरात एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्यांच्याकडे चार एसएलआर देण्यात आल्या आहेत तसेच सुरक्षिततेची इतर साधने त्यांच्याकडे आहेत. पोलीस व्हॅनच्या माध्यमातून चोवीस तास हे पथक अभयारण्य परिसरात गस्त घालत आहे. >कर्नाळा अभयारण्य परिसरात आमचा बंदोबस्त पूर्वीपासून असतो. मात्र उरणमध्ये काही संशयित घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे सर्च सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही कर्नाळा अभयारण्यात गस्त वाढवली आहे.तसेच याबाबत आजूबाजूच्या ग्रामस्थांना अलर्ट करण्यात आले आहे. वन कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे.- मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस, ठाणे