पुणे : कोकणातील काही ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पाऊस कोयनेतील नवजा येथे ३२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासात कोयना (नवजा) ३२०, महाबळेश्वर, शिरगाव २१०, दावडी,राधानगरी १९०, वाल्पोई १६०, चांदगड १५०, ताम्हिणी १७०, कणकवली, पोलादपूर, संगमेश्वर, देवरुख, सावंतवाडी, आजारा १२० मिमी पावसाची नोंद झाली होती. विदर्भातील सिरोंचा, अहिरी, महागाव, मराठवाड्यातील हिमायतनगर, किनवट, माहूर येथे जोरदार पाऊस झाला. सोमवारी दिवसभरात महाबळेश्वर येथे ४८, डहाणु ५४, सांताक्रुझ १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
१८ ऑगस्ट रोजी कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर १९ व २० ऑगस्टला पावसाचे प्रमाण कमी असेल, त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी या सहा जिल्ह्यांसाठी पुन्हा अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.