देशात आतापर्यंत १२९ शेतमाल उत्पादनांना हे मानांकन मिळाले आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे २६ उत्पादने महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये नाशिकच्या द्राक्षांसह कोकणचा हापूस, लासलगावचा कांदा, कोल्हापूरचा गूळ, नागपूरची संत्री, सोलापूरची ज्वारी, नवापूरची तूरडाळ, पुरंदरचे अंजीर अशा अनेक उत्पादनांचा समावेश आहे.
हे मानांकन मिळाल्यामुळे या सर्व उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली. उत्पादन वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.जीआय मानांकनची मागणी वैयक्तिक करता येत नाही. समूहाने करावी लागते. त्या शेतमालाचे उत्पादनही त्या परिसरातील एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी करणे आवश्यक असते. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित संस्थेच्या वतीने वर्षभर त्याचे परीक्षण सुरू असते.
त्यात त्या उत्पादनाच्या परिसराच्या इतिहासाबरोबरच वस्तूच्या गुणवत्तेतील सातत्य, वैशिष्ट्यपूर्णत: अशा अनेक गोष्टींची तज्ज्ञांच्या पथकाद्वारे शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली जाते. या कसोट्या पार केल्यानंतर पुन्हा तब्बल सहा महिने जनमत अजमावले जाते. इतक्या कठोर परीक्षणानंतरच हे मानांकन दिले जाते.