- जयंत धुळप
अलिबाग, दि. 17- अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे. ऋषभ सिव्हा (24) या तरूणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. तब्बल २९ तासांनंतर नैसर्गिक भरतीत अलिबाग जवळच्याच नागाव समुद्र किनारी हा मृतदेह सापडला आहे. अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना दोन जण बुडाल्याची घटना घडली होती. दरम्यान सौरभ खान या पर्यटकाचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३० वाजता नैसर्गिक भरतीच्या वेळीच तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्र किनारी सापडला होता. पण त्या तरूणाचं सौरभ खान असं नाव नसून सोहराब खान असं नाव असल्याचं त्याच्या नातेवाईक येथे आल्यावर त्यांच्याकडून समजल्याचे वराडे यांनी सांगीतलं.
आणखी वाचा
सौरभचा मृतदेह सापडला
अवघ्या १५ मिनिटांत दोघांच्या आत्महत्या
सोहराब खान आणि ऋषभ सिव्हा या दोघा तरुण पर्यटकांचे फोटो आम्हाला तपासादरम्यान त्यांच्याच मोबाईलमधून उपलब्ध झाले. मंगळवारी दुपारी २ वाजता कुलाबा किल्ल्यात जाण्यापूर्वी त्यांनी ते अलिबाग समुद्र किनारीच काढले आहेत. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील स्मृती आपल्या जवळ राहाव्या या हेतूने काढलेले हे त्यांचे फोटो, काही तासानंतर होणाऱ्या त्यांच्या मृत्यूअंती पोलिसांना मृतदेहाची आेळख पटवण्यासाठी कामी येतील असे त्यांच्याही आणि पोलिसांच्याही मनात नव्हते. परंतु नियतीला तेच मंजूर होते. मी आणि माझी संपूर्ण टीम मंगळवारी घडलेल्या या दूर्दैवी घटनेपासून अत्यंत विषण्ण मनस्थितीत होतो. नातेवाईकांची मनस्थिती पाहील्यावर आम्हालाही दुःख अनावर झाले. अशी दुर्दैवी परिस्थिती कुणाच्याही वाट्याला येवू नये. ऐन उमेदीतील आपली मुले गमावणे यापेक्षा अतिव दूखः आई-वडिलांना दूसरे कोणतेही असू शकत नाही. तरुणाईने कुणीतरी काहीतरी सांगतय ते आपल्याच भल्याचे आहे, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे, अशी अत्यंत हळवी भावना या साऱ्या प्रसंगांती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी व्यक्त केली आहे.