मुंबई : माहीमच्या कापड बाजार भागातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात झालेल्या राजेंद्र गुप्ता या व्यापाऱ्याच्या खुनाबद्दलच्या खटल्यात सर्व पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयानेही निर्दोष मुक्तता केल्याने या खटल्याची २० वर्षांनी कोणालाही शिक्षा न होता सांगता झाली आहे.राजकीय कार्यकर्ते असलेले गुप्ता त्यांच्या दुकानाच्या समोरच गणपती मंडपात मंडप कंत्राटदार राजाराम सरफरे यांच्याशी बोलत बसले असता १२ आॅगस्ट १९९५ रोजी भर दुपारी दोघांनी गोळ््या झाडून त्यांचा खून केला होता. पोलिसांनी या खटल्यात तब्बल पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उभे केले होते. परंतु अभियोग पक्षाच्या इतर उणिवा व त्रुटींसह या सर्वांची साक्ष न्यायालायने विश्वासार्ह न मानल्याने आरोपी निर्दोष सुटले.एकूण १३ आरोपींवर हा खटला दाखल केला गेला होता. त्यापैकी सहा आरोपी खटला प्रलंबित असताना मरण पावले किंवा फरार झाले. सत्र न्यायालयाने सैयद उमर सैयद अब्बास, आबिद उस्मान खान, मोहम्मद इब्राहिम आदम हुसैन, सरदार अली सफदर अली खान आणि मोहम्मद शब्बीर मिर्झा कासीम या पाच आरोपींना दोषी ठरवून जन्मठेप ठोठावली व दोन आरोपींना निर्दोष सोडले. मात्र या पाच आरोपींना पुढे उच्च न्यायालायने अपिलात निर्दोष मुक्त केले. याविरुद्ध राज्य सरकारने केलेले अपील काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळले.गोळीबारात जखमी झालेल्या राजाराम सरफरेखेरीज हेमंत परशुराम अक्रे, गणेश, राजेश तानाजी अक्रे आणि किशोर मणिलाल दमाणिया हे या खटल्यातील पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. विसंगती व त्रुटींमुळे यांच्या साक्षींवरून हा खून आरोपींनीच केला हे नि:संदिग्धपणे सिद्ध होत नाही. शिवाय आरोपींची दोन वेळा घेतलेली ओळख परेडही सदोष होती, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. (विशेष प्रतिनिधी)
खून खटल्यात सर्व आरोपी निर्दोष
By admin | Published: February 18, 2016 6:57 AM