मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : दुष्काळात पशुधन जगविणं कठीण झालं होतं; मात्र शासनानं चारा छावण्या सुरू केल्या़ जनावरं छावणीत आली. त्यांच्या देखभालीसाठी त्यांचे मालकही आले. जनावरं जगविण्यासाठी घरदार सोडून अनेकजण सध्या गणेशवाडी येथील छावणीवर आले आहेत. कधीकाळी एकमेकांचा साधा परिचयही नसलेल्या या माणसांचा जणू हा एक गावच उभा झालाय.
यावर्षी दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या तालुक्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका माणसांबरोबरच पशुधनालाही बसत आहे. तालुक्यातील जनावरांना या दुष्काळाची झळ पोहोचू नये म्हणून शासनाने मंगळवेढा तालुक्यात ५४ छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यात ३० हजारांहून अधिक लहान-मोठी जनावरे सांभाळली जात आहेत.
गावापासून दूर माळरानावर सुरू झालेल्या गुरांच्या छावण्यांच्या परिसराकडे पाहिले असता पशुधन जगविण्यासाठी घरदार, कुटुंब सोडून छावण्यांमध्ये एकत्र आलेली ही मंडळी एकमेकांसोबत सुख-दु:खाच्या गोष्टीत रमताना दिसत आहेत. चारा छावणीच्या निमित्ताने जनावरे जगविणे, या एकाच ध्येयाने जोडलेल्या व जनावरांना घेऊन चारा छावण्यांमध्ये एकत्र आलेल्या शेतकºयांचे जणू नवे गावच वसल्याचे दिसून येते.
यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने शेती व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला़ पशुधन अधिक असले तरी दुग्ध व्यवसायही दुष्काळाने अडचणीत आला आहे. ५४ छावण्या सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील गणेशवाडी येथील चारा छावणीला भेट दिली असता या ठिकाणी ६३० जनावरे असल्याचे दिसून आले. शहरापासून जवळ असल्याने ही चारा छावणी म्हणजे शहराला दूध पुरवठा करणारे केंद्र बनले आहे. ११ एकर परिसरात ही गुरांची छावणी असून तालुक्यात याहून अधिक एकरावर वसलेल्या मोठ्या छावण्या म्हणजे एक छोटं गाव वसल्यासारखेच चित्र छावण्या पाहिल्यानंतर वाटते.
गणेशवाडी येथील सिद्धेश्वर कदम यांच्या श्रीराम दूध उत्पादक संस्थेच्या वतीने शासनाच्या सुरू असलेल्या छावणीमध्ये आलेल्या पशुपालक दादा दत्तू बाबर, नवनाथ मोरे, नंदा शांतीनाथ आसबे, सुमन तुकाराम वाकडे, सिंधुताई सदाशिव कदम यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला़ या चारा छावणीला टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. जनावरांना पाण्याची सध्या तरी अडचण नाही; मात्र आम्हा पशुपालकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, जनावरांना २० किलोपर्यंत चारा द्यावा, एका कुटुंबातील पाच जनावरे असावी ही जाचक अट रद्द करावी, पशुपालकाला रोज एका रोजगार हमी योजना मजुराचा पगार द्यावा, एकवेळचे जेवण द्यावे, यासह अनेक मागण्या शेतकºयांनी केल्या. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, हीच अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली़
रंगतात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा- चारा घेतल्यानंतर व धारा काढल्यानंतर येथे उर्वरित रिकाम्या वेळेत शेतकºयांचा गप्पांचा फड रंगतो. पाऊस कधी पडेल, यापासून ते थेट सरकारने शेतकºयांसाठी काय केले आणि काय केले पाहिजे, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नेमके काय होऊ शकते, कोण खासदार होणार, या निवडणुकीत कोणा कोणाची जिरणार, कोणत्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येतील, अशा विविध गप्पा येथे ऐकण्यास मिळाल्या़
आजपर्यंत आपल्या घराला, संसाराला ज्या जितराबानी आपल्याला साथ दिली़ त्या जितराबाला आता या दुष्काळी संकटात चांगलं जतन करायचं यासाठी आम्ही घरबार छावणीत आलो आहोत. - सुमन तुकाराम वाकडे, पशुपालक
छावणीवर जनावरांना पिण्यासाठी हवे तेवढे पाणी दिले जाते; मात्र जनावरांप्रमाणे छावणीत राहणाºया पशुपालकाला सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय करावी़ पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागते.- दादा दत्तू बाबर, पशुपालक
मी मार्च महिन्यात १० लहान- मोठ्या जनावरांना तीन टँकर पाणी विकत घेऊन पशुधन सांभाळले़ सध्या छावणी सुरू झाल्याने आम्ही सर्वजण चारा छावणीवर आलो आहोत. जितराबाची चिंता मिटली आहे - नवनाथ मोरे, पशुपालक गणेशवाडी
जनावरांची हजेरी संगणक प्रणालीवर- चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यासाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम हे अॅप विकसित करण्यात आले आहे. चारा छावणी चालकांना हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतले आहे़ त्या आधारेच छावणीतील जनावरांच्या दैनंदिन नोंदी केल्या जात आहेत. सध्या तालुक्यात ५४ छावणी असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली़
मामाच्या गावाला यंदा बुट्टी- दरवर्षी उन्हाळी सुट्टी लागली की मामाच्या गावचे वेध लहान मुलांना लागतात; मात्र यंदा घरातील जनावरे छावणीत आणली असल्याने घरातील वयोवृद्धांबरोबर लहान मुले पण छावणीत राहत आहेत़ त्यांना यावर्षी उन्हाळी सुट्टीवर संक्रांत आली आहे़ या छावणीत आलेला सूरज तानगावडे हा दरवर्षी खर्डी येथे मामाच्या गावाला उन्हाळी सुट्टीला जातो; मात्र यंदा उन्हाळी सुट्टी छावणीत आहे़ सूरजप्रमाणे २० ते २५ मुले येथे आहेत; मात्र या गावात मुंबई, पुणे येथून मामाच्या गावाला सुट्टीसाठी आलेला विनायक गायकवाड हा आपले सगळे मित्र छावणीत आले असल्याने तोही मामाच्या गावाला आला असला तरी छावणीत असणाºया मित्रासोबत तेथेच मौजमजा करत आहेत़