मुंबई : कोकणातील राजापूर तालुक्यात नाणार येथे उभारण्यात येत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यामुळे राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणूक असेल, त्या ठिकाणी संघटनेतर्फे भाजपा विरोधात प्रचार मोहिम राबविण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली.भाजपाचे मुख्यमंत्री व पंतप्रधान व इतर सर्व पदाधिकारी खोटी माहिती देऊन कोकणवासीयांचा विश्वासघात करत आहेत. त्यामुळे राज्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाविरोधात प्रचार करण्यात येईल व भाजपा विरोधातील उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी संघटनेतर्फे सध्या राज्यातील विविध ठिकाणी जाऊन शेतकरी, त्रस्त नागरिक, संघटना यांना भेटून त्यांच्यासोबत लढा देण्यात येणार आहे. त्यासाठी संघटनेतर्फे संपर्क अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.या प्रकल्पाला विरोध असतानाही मुख्यमंत्र्यांनी वारंवार आमची फसवणूक केली आहे. चर्चेचे आश्वासन देऊनही परस्पर सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून नाणारचा भाग सौदी अरेबियाच्या सुलतानाला देण्याचा घाट सरकारने रचल्याचा आरोप वालम यांनी केला. टप्प्याटप्प्याने कोकणातील जागा सुलतानाला देण्याचा सरकारचा डाव असल्याचे ते म्हणाले. या विरोधात संघटनेने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाविरोधात ठिकठिकाणी जनजागृती केली जाणार आहे.
राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपा विरोधी प्रचार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:52 AM