- ऑनलाइन लोकमत
राळेगण सिद्धी, दि. 6 - आम आदमी पक्षात सध्या सुरु असलेल्या राजकीय वातावरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. सोबतच एकवेळचे आपले सहकारी असणारे अरविंद केजरीवाल यांच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा संपल्या असल्याची खंतही बोलून दाखवली आहे. अरविंद केजरीवाल यांचा सहकारी मंत्री संदीप कुमार सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकला आहे, काही मंत्री जेलमध्ये गेले आहेत, तर काही भ्रष्टाचारात अडकले आहेत हे पाहणं वेदनादायी असल्याचंही अण्णा हजारे बोलले आहेत.
'मला खूप दुख: झालं आहे. जेव्हा केजरीवाल माझ्यासोबत होते तेव्हा त्यांनी ग्रामस्वराज्यवर पुस्तक लिहिलं होतं. याला ते स्वराज्य म्हणतात का ? यामुळे मी दुखी आहे. त्यांच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा आता संपल्या आहेत', असं अण्णा हजारे बोलले आहेत.
आप नेता संदीप कुमार सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्याच्या पार्श्वभुमीवर बोलताना अण्णा हजारे यांनी ही टीका केली. अण्णा हजारे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन छेडल्यानंतर अरविंद केजरीवाल प्रकाशझोतात आले होते.
मनमोहन सिंह सरकारच्या काळात झालेल्या या आंदोलनाचा चेहरा जरी अण्णा असले तरी यात प्रमुख भूमिका केजरीवालांची होती. मात्र आंदोलनानंतर दोघेही वेगळे झाले होते. राजकारणात प्रवेशाच्या मुद्द्यावरुन अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल वेगळे झाले होते.
अरविंद केजरीवाल यांनी यानंतर आम आदमी पक्षाची स्थापना करुन दिल्लीत सत्ता मिळवली. मात्र अण्णांनी केजरीवालांना पाठिंबा देण्यास नकार देत फारकत घेतली.