राज्य मंत्रिमंडळ विस्तारात एक अनार, सौ बिमार; तिन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी
By अतुल कुलकर्णी | Published: July 10, 2023 06:02 AM2023-07-10T06:02:15+5:302023-07-10T06:02:55+5:30
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेचे वादळ ताशी १८० किलोमीटर वेगाने धावत आहे. हे वादळ कुठे धडकणार, हे या आठवड्यात कळेल.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल; या चर्चेचे वादळ ताशी १८० किलोमीटर वेगाने धावत आहे. हे वादळ राजभवनाच्या दिशेने जाऊन स्थिरावणार की, अरबी समुद्रात विलीन होणार हे या आठवड्यात कळेल. मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळी आपला नंबर लागेल या आशेने शिंदे गटासोबत भाजपचे नेतेही देव पाण्यात घालून बसले होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या राजकीय हाणामारीत आपला नंबर लागेल की नाही, याची आता कोणालाही खात्री वाटत नाही.
भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. त्यासाठी आशिष शेलार कामाला लागले आहेत. या विस्तारात शेलार यांना मंत्रिपद मिळावे, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. शेलार यांना मुंबईची जेवढी माहिती आहे, तेवढी खचितच अन्य कोणाला असेल. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळात त्यांचा नंबर लागला नाही. राज्याचे प्रदेशाध्यक्ष होता होता, त्यांना मुंबई भाजप अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजपला मराठा चेहरे समोर आणावे लागतील. नाही तर राष्ट्रवादीतून भाजपसोबत गेलेले नेते वरचढ ठरू शकतात. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे चेहरे भाजपने मुंबईतून पुढे आणले तर समतोल साधला, असे भाजपला सांगता येईल. मुंबईत शेलार यांच्यासोबत जुळवून घेऊ शकेल, असा नेता म्हणून प्रसाद लाड यांच्याकडे पाहिले जाते. लाड मराठा आहेत. ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांचे त्यांचे स्वतःचे नेटवर्क आहे. शेतकऱ्यांचा आठवडी बाजार आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी मुंबईत स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. मुंबई महापालिका आणि कोकणपट्ट्यात आपला उपयोग होऊ शकतो, असे लाड यांच्या समर्थकांनी श्रेष्ठींना पटवून देण्यात यश मिळवले आहे. लाड यांना विस्तारात संधी मिळाली तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
दरेकर यांच्यासोबत मुंबई बँक आहे. तेथील मोठे नेटवर्क त्यांच्या फायद्याचे ठरू शकते. त्यांच्या मागच्या चौकशांचा ससेमिरा सध्या तरी थांबलेला आहे. शेलार आणि फडणवीस यांच्यात सख्य आहे की नाही, याच्या बातम्या सतत येत असतात. पण लाड, दरेकर आणि फडणवीस यांचे गणित चांगले जुळलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर लाड व दरेकर यांना मंत्रिपद मिळावे, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. मुंबईतून योगेश सागर हेदेखील मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे असल्यामुळे ठाण्यात भाजपला स्वतःच्या नेत्यांना ताकद द्यावी लागणार आहे. ठाण्यातून निरंजन डावखरे, पनवेलमधून प्रशांत ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत. त्यासोबतच डॉ. संजय कुटे, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे ही काही नावे भाजप वर्तुळात मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागले आहे. काही खुलेपणाने तर काही पडद्याआडून काम करत आहेत. आतापर्यंत सगळ्यांनाच कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले आहे. त्यामुळे आता किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री करायचे हे कठीण गणित शिंदे, फडणवीस, पवार यांना सोडवावे लागणार आहे. आठ दिवस झाले तरीही राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना खाते मिळालेले नाही. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची यादी दिल्लीने थांबून ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. अजित पवार यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या देऊ नये, यासाठी शिंदे गटाचा विरोध असल्याच्या बातम्या जुन्या झाल्या आहेत. काहींनी मातोश्रीला साद घातल्याच्याही बातम्या सर्वत्र आहेतच. या सर्व पार्श्वभूमीवर या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला, तर खऱ्या अर्थाने या सरकारची ती तारेवरची कसरत ठरेल. तिघे कसा तोल सांभाळतील हे त्यातून दिसेल.
अधिवेशन आले की मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशा बातम्या येतात. अधिवेशन संपले की अधिवेशनानंतर विस्तार होणार, अशा बातम्या सुरू होतात. हा सिलसिला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून महाराष्ट्र पाहत आला आहे. त्यामुळे सध्या तरी गाजराची पुंगी वाजत आहे. पुढे काय होईल माहिती नाही.
जे सक्रिय राजकारणात आहेत त्यांनादेखील आपापल्या पक्षात काय चालू आहे याचा कसलाही अंदाज येत नाही. काल आम्ही ज्यांच्याविरोधात घोषणा दिल्या, ज्यांना प्रचंड टीकेचे लक्ष केले, त्यांना आज सत्तेत सहभागी झालेले पाहून, आमची बोलती बंद झाल्याच्या प्रतिक्रिया अत्यंत कॉमन आहेत. घरघर अभियानाअंतर्गत भाजपचे नेते फिरत असताना त्यांना प्रत्येक घरात ही नाराजी ऐकून घ्यावी लागत आहे.
राज ठाकरे यांनी ‘एक सही संतापाची’ हे अभियान राबवले. त्यासाठीच्या फलकावर संघात काम करणारी एक व्यक्ती आपला संताप सहीद्वारे व्यक्त करत असल्याचे छायाचित्र महाराष्ट्रभर फिरत आहे.
गेल्या आठ दिवसांत अजित पवार, फडणवीस आणि शिंदे यांच्याविरोधात जेवढे सोशल मीडियातून मिम्स आले, प्रतिक्रिया उमटल्या त्या अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीत. हा सामाजिक रोष सर्वत्र असताना स्वपक्षातील असंतोषही शांत करत मंत्रिमंडळ विस्तार करणे ही सोपी गोष्ट नाही. याचे उत्तर या आठवड्यात मिळेल.
शिंदे गटात इच्छुकांची मोठी यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे ४० आमदार एक शिवसेना सोडून दुसऱ्या शिवसेनेत गेले. त्यांच्यातील इच्छुकांची यादी भली मोठी आहे. दहा जणांनी एक वर्ष मंत्रिपद उपभोगले. आता त्यांना बाजूला करून इतरांना संधी द्या, असे सांगण्यापर्यंत इच्छुकांनी दबाव वाढवला आहे. राष्ट्रवादी पक्ष जर सोबत आला नसता, तर किमान १५ जणांना तरी मंत्रिपदे मिळाली असती. मात्र, आता ती संधी गेली, हे आमदारांच्याही लक्षात येत आहे. त्यामुळेच नाराजांची संख्या जास्त आहे. शिंदे गटाच्या ४० आमदारांना एवढी जास्त मंत्रिपदे आणि आपल्याकडे १०५ आमदार असून आपल्याला कमी मंत्रिपदे का? ही भाजपमधली नाराजी असताना आता अजित पवार गटालालाही मंत्रिमंडळात बरोबरीचा वाटा हवा आहे. अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत, याची संख्या कोणीही ठामपणे सांगायला तयार नाही. मात्र, मंत्रिपदे बरोबरीची हवी, असा आग्रह धरला जात आहे. जनता जनार्दनाने मात्र हे सगळे राज्याच्या विकासासाठी चालू आहे, हे ध्यानात ठेवावे.
लोक काय म्हणतात?
राज्यात असे चित्र असले, तरी महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली, ती तुम्हाला कशी वाटली? अजित पवार भाजपसोबत गेले, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असे जर मुंबई, ठाण्यात फिरताना दहा लोकांना विचारले, तर सात लोक राजकारणाची आता आम्हाला शिसारी येऊ लागली, असे सांगताना दिसतात.