ऑनलाइन लोकमतकोतूळ, दि. 11 - अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी) येथे बंधाऱ्यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीसह चौघांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे ऐन दसऱ्याच्या दिवशीच सातेवाडीवर शोककळा पसरली आहे.कोतूळपासून अठरा किलोमीटर अंतरावर सातेवाडी असून, हा सर्व डोंगराळ, आदिवासी भाग आहे. येथील सुनंंदा सुनील मुठे (वय ३०) या मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास गावाजवळीलच नागकापी सिमेंट बंधाऱ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी ज्योती (वय ९), भाची दीपाली यमा गभाले (वय १०), तर पुत्नी अस्मिता दुंदा मुठे (वय १२) अशा तिघी मुली गेल्या होत्या. सुनंदा या धुणे धुण्यात व्यस्त असतानाच ज्योती व दीपाली बंधाऱ्याच्या काठावर पाण्यात पोहत होत्या. परंतु काही वेळाने या दोघीही पाण्यात ओढल्या गेल्याने बुडू लागल्या. हे पाहून दीपालीची आई सुनंदा व अस्मिता या दोघीही पाण्यात उतरल्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्याही बुडाल्या. पोहता येत नसल्याचे चौैघांचाही मृत्यू झाला. तब्बल तासाभराने आजूबाजूच्या काही लोकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे बंधाऱ्यावर लोकांनी गर्दी केली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. गावकऱ्यांनी चौघींचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. सुनंदा यांच्यामागे पती सुनील, तसेच सासू-सासरे असा परिवार आहे. सुनंदा यांची भाची दीपाली ही त्यांच्याकडे शाळेला होती. दोन दिवसांपूर्वीच अपघाताची घटना दोन दिवसांपूर्वी सातेवाडी येथीलच टेम्पो दरीत कोसळून दोन ठार, तर २१ जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सातेवाडीवर शोककळा पसरली आहे.
मायलेकीसह चौघांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2016 6:41 PM