ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:19 PM2024-11-13T18:19:37+5:302024-11-13T18:20:51+5:30

Maharashtra Election 2024: मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

All India Personal Law Board supports 'MVA'; Announcement of Maulana Sajjad Nomani | ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा

ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसीसह मुस्लिम मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अशातच, ऑल इंडिया एकता फोरमनने या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. मुस्लिम धर्मगुरू मौलाना खलील उररहमान सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी ही घोषणा केली आहे.

याबाबत बोलताना मौलाना सज्जाद नोमानी म्हणाले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. यात मराठा आणि ओबीसी समाजातील 170, एस/एसटीमधील 53, इतर वर्गातील 40 उमेदवारांसह 23 मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे.

बोर्डाने घातलेली अट 
दरम्यान, संघटनेकडून महाविकास आघाडीला शनिवारी(9 नोव्हेंबर) 17 मागण्यांचे पत्र पाठवण्यात आले होते. निवडणुकीत पाठिंबा हवा असेल, तर या मागण्या मान्य कराव्या लागतील, असे त्या पत्रात लिहिले होते. संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध, नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण, 2012-24 मध्ये दंगलीच्या आरोपात तुरुंगात टाकलेल्या निरपराध मुस्लिमांची सुटका, महाराष्ट्रातील 48 जिल्ह्यांतील मशीद, दर्गा आणि स्मशानभूमीचे सर्वेक्षण आणि महाराष्ट्राच्या वक्फ बोर्डाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी, या मागण्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी आघाडीला या मागण्या मान्य असतील, तर निवडणुकीत आम्ही निश्चितपणे पाठिंबा देऊ, असे मंडळाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

महायुतीला बसणार फटका?
ऑल इंडिया एकता फोरमने घेतलेल्या या निर्णयामुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपला मुस्लिमांची फारशी मते मिळत नसली तरी, महायुतीत सामील असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला फटका बसू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा असतो, पण आता या निर्णयामुळे त्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिंदेसेनेचे अब्दुल सत्तार, शायना एनसी, अजित पवार गटाचे नवाब मलिक, नबीज मुल्ला अशा मुस्लिम मतदारांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना याचा फटका बसतो का, हे पाहणे महत्वाचे आहे. याशिवाय, राज्यात अनेक हायप्रोफाईल मतदारसंघ आहेत, जिथे महायुतीच्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.

महाराष्ट्रात मुस्लिम मतदार किती महत्त्वाचा ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मुस्लिम मतदार फार महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्रात 11 टक्के मुस्लिम मतदार आहेत. याशिवाय राज्यात जवळपास 120 विधानसभेच्या जागा आहेत, जिथे मुस्लिम मतदारांची मोठी भूमिका दिसत आहे. यापैकी 60 जागा अशा आहेत जिथे 15 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत आणि 38 जागांवर 20 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. विधानसभेच्या 9 जागांवर 40 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. राज्यातील काही जागा अशा आहेत, जिथे मुस्लिम मतदारांसाठी संख्या इतर धर्मीयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकार स्थापनेत त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. 

Web Title: All India Personal Law Board supports 'MVA'; Announcement of Maulana Sajjad Nomani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.