मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 01:28 PM2024-10-20T13:28:04+5:302024-10-20T13:28:58+5:30
Uddhav Thackeray MVA Seat Sharing: मविआची काल १० तास बैठक, राऊत म्हणतायत विषय गंभीर... इकडे उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलविली असताना तिकडे आदित्य ठाकरे, अनिल परबांना शरद पवारांकडे का पाठविले?
महाविकास आघाडीचे जागावाटप अखेरच्या टप्प्यात आले आहे. शनिवारी दहा तास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेची बैठक सुरु होती. ही बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलविल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीचे वृत्त येत नाही तोच आदित्य ठाकरे आणि अनिल परब शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. यामुळे मविआत जागावाटपावरून काहीतरी सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मातोश्रीवरील बैठकीला आदित्य ठाकरे, अनिल परब यांची उपस्थिती गरजेची असताना या दोघांना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे पाठविल्याने मविआत जागावाटपावरून काहीतरी बिनसल्याचे संकेत मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यात तू तू-मै मै झाल्याची चर्चा असतानाच शनिवारी दुपारी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बैठक पार पडली. यानंतर आज लगेचच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी विषय महत्वाचा आणि गंभीर असल्याचे सूतोवाच केले आहे.
''काल साधारण दहा तास बैठक झाली. आज सकाळी माझी आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरविणार आहोत'', असे संकेत राऊत यांनी दिले आहेत. पुढील वाटचालीसाठी म्हणजे नेमके काय असा सवाल राजकीय वर्तुळात पडला आहे.
काही जागांवरून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद आहेत. यातूनच पटोले आणि राऊत यांचे वाजल्याचे वृत्त होते. यानंतर शनिवारी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला व काही नेत्यांनी थेट मातोश्री गाठली होती. यानंतर नाना पटोलेंचीही राऊतांना टोलेबाजी करणारी वक्तव्ये आली होती. ठाकरेंसोबतच्या बैठकीत दुपारी ३ वाजता मविआची जागा वाटपाची बैठक ठरली होती. या बैठकीनंतर पुन्हा काहीतरी बिनसल्याचे संकेत राऊत यांच्या वक्तव्यांवरून मिळत आहेत.