सर्व पक्षांना ‘व्यापारी’च जवळचे
सर्वाधिक उमेदवार व्यावसायिक : नोकरदारांकडे पाठ : २७ टक्के उमेदवार गृहिणी
योगेश पांडे
नागपूर : राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध असतो असे म्हणतात. अनेक व्यावसायिकांचे राजकारण्यांशी जवळचे संबंध असतात. मात्र आता व्यापाºयांनाच राजकारणी बनण्याचे वेध लागले आहे. नागपूर मनपा निवडणुकात याचे प्रत्यंतर येत आहे. निवडणुकीच्या रिंगणातील ५५ टक्के उमेदवार हे व्यापारीच आहेत. उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी नोकरदार कार्यकर्त्यांकडे पाठ फिरविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या व्यवसायाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. नागपूर शहरात एकूण ११३५ उमेदवार निवडणूक लढत आहेत. यापैकी ६२४ उमेदवारांनी आपली उपजीविका व्यापारावर चालत असल्याचे स्पष्ट केले आहे. ही टक्केवारी ५५ टक्के इतकी आहे, म्हणजेच प्रत्येकी दोघांत एक उमेदवार व्यापारी आहे. केवळ ४२ टक्के उमेदवारांनी शेती हे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून दाखविले आहे, तर ८५ उमेदवार हे काहीच करीत नसल्याचे शपथपत्रात नमूद आहे. विशेष म्हणजे, काहीच करीत नसले तरी यातील अनेक उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न व संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे.
केवळ ७७ उमेदवार नोकरदार
नोकरदार वर्गाला राजकारणापासून दूर राहणारा पांढरपेशा वर्ग असे म्हटले जाते. या निवडणुकांसाठी अनेक नोकरदार कार्यकर्त्यांनी विविध पक्षांकडे तिकिटांसाठी मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात बहुतांश जणांच्या पदरी निराशाच पडली. केवळ ७७ उमेदवार हे नोकरी करणारे आहेत.
उमेदवारांचे पक्षनिहाय प्रमुख व्यवसाय
पक्षव्यापारीनोकरीकृषी
भाजपा७८६६
काँग्रेस७६७४
राष्ट्रवादी ४६६२
शिवसेना ४४११२
बहुजन समाज पक्ष ५४६१
‘होम मिनिस्टर’ला प्राधान्य
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महिलांसाठी असलेले आरक्षण लक्षात घेता सर्व लहानमोठ्या पक्षांनी घरातील ‘होम मिनिस्टर’ला प्राधान्य दिले आहेत. एकूण महिलांपैकी ३०७ उमेदवार या गृहिणी आहेत. यात आजी-माजी नगरसेविकांचादेखील समावेश आहे. सर्वाधिक ५४ गृहिणी भाजपात आहेत, तर कॉंग्रेसमध्ये हीच संख्या ४७ इतकी आहे. राष्ट्रवादीने २६, शिवसेनेने १७ तर बसपाने ३० गृहिणींना निवडणुकांच्या सामन्यात उतरविले आहे.
कॉंग्रेस-भाजपात सर्वाधिक उमेदवार ‘व्यापारी’
व्यापारी उमेदवार देण्याच्या बाबतीत कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी आघाडी घेतली आहे. भाजपाने ७८ तर कॉंग्रेसने ७६ ‘व्यापारी’ कार्यकर्त्यांना उमेदवार केले आहे. यात अनुक्रमे २० व २१ महिला उमेदवारांचादेखील समावेश आहे. सर्वाधिक ११ नोकरदार उमेदवार शिवसेनेने दिले आहेत तर ६ शेतकरी उमेदवार भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.