बाळासाहेब बोचरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्टÑाच्या विधिमंडळाच्या आजवर अनेक महिला लोकप्रतिनिधींनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असताना विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी आखडता हात घेतल्याचे दिसून येते. निवडणूक रिंगणात २३५ महिला उमेदवार असले तरी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेल्या महिलांची संख्या फक्त ५९ एवढीच आहे.
महाराष्टÑ हे जागरूक, पुरोगामी आणि नेतृत्व देणाऱ्या महिलांचे राज्य मानले जाते. प्रतिभाताई पाटील, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, शालिनीताई पाटील, सूर्यकांता पाटील, रजनी पाटील, मीनाक्षी पाटील, प्रभा राव, सरोज काशीकर, प्रभाताई झाडबुके, निर्मलाताई भोसले, सुशीला बलराज, इंदिराबाई कोटंबकर, मालती शिरोळे, कांता नलवडे, विमल मुंदडा, जयवंतीबेन पटेल, निवेदिता माने, प्रेमलाकाकी चव्हाण, सरोजिनी बाबर अशा अनेक महिलांनी महाराष्टÑाच्या राजकारणात आपली छाप पाडली आहे. अलिकडच्या काळात पंकजा मुंडे, यशोमती ठाकूर, निर्मला गावीत, प्रणिती शिंदे, विद्या ठाकूर, माधुरी मिसाळ, भारती लव्हेकर, मनीषा चौधरी, वर्षा गायकवाड या महिला आमदार विधानसभेत चांगली कामगिरी करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्टÑातील ४८ खासदारांपैकी ८ खासदार या महिला असून त्यामध्ये भाजपच्या चार खासदारांचा समावेश आहे. तरीही आतापर्तंच्या निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्यामध्ये भाजपने आघाडी घेतली असून सर्वाधिक १७ महिलांना या पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्याखालोखाल काँग्रेस पक्षाने १६ महिलांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना व राष्टÑवादीने प्रत्येकी ८ महिलांना उमेदवारी दिलीं आहे. वंचितमधून ११ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाराष्टÑाच्या स्थापनेपासूनमहिलांची कामगिरी१९६२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत २६४ जागांपैकी १९ महिला निवडणूक रिंगणात होत्या. त्यापैकी १४ निवडून आल्या होत्या. त्यामध्ये मणिबेन देसाई, शकुंतला साळवे, कामर नायर अहमद, अंजनाबाई मगर, चंपा मोकळ, मालती शिरोळे, निर्मलाराजे भोसले, प्रभाताई झाडबुके, प्रतिभाताई पाटील, रमाबाई देशपांडे, इंदिराबाई कोटंबकर, कुसुमताई कोरपे आदींचा समावेश होता. यापैकी प्रतिभाताई पाटील यांनी राष्टÑपतीपदापर्यंत मजल मारली. प्रभाताई झाडबुके, निर्मलाताई भोसले यांनीही पुढील काही वर्षे कारकीर्द गाजवली.१९६७ सालच्या निवडणुकीत २७० जागांपैकी ९ महिला उमेदवार होत्या. त्यापैकी ८ निवडून आल्या. १९७२ साली २१ महिला निवडणूक रिंगणात होत्या. त्यापैकी १४ निवडून आल्या. यामध्ये ग्रामीण भागातील प्रभावती शिंदे, उषा जगदाळे, निर्मला ठोकळ, शैलजा शितोळे, शकुंतला पाटील, कोकिळा पाटील आदींचा समावेश होता. १९७८ च्या निवडणुकीत १३ महिला उमेदवार होत्या. त्यापैकी सहा निवडून आल्या. त्यामध्ये प्रभा राव, कुसुमती अभ्यंकर, जयवंतीबेन मेहता, कमल देसाई, आणि कमलकुमारी वाजपेयी यांचा नव्याने विधिमंडळात प्रवेश झाला.१९८५ साली निवडणुकीत उतरलेल्या २८ महिलांपैकी १५ निवडून आल्या. मृणाल गोरे, पुष्पाताई हिरे, रजनी सातव यांचा याच निवडणुकीतून विधानसभेत पहिला प्रवेश झाला. १९९० च्या निवडणुकीत १७ पैकी तब्बल ११ महिला पराभूत झाल्या होत्या तर केवळ सहा निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत शोभा फडणवीस सावलीमधून तर विमल मुंदडा केजमधून पहिल्यांदा आमदार झाल्या, तर पहिल्याच निवडणुकीत कोरेगावमधून शालिनीताई पाटील पराभूत झाल्या. १९९५ साली झालेल्या सत्तांतरावेळी २८ महिला उमेदवारांपैकी ११ महिला निवडून आल्या होत्या. शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षीताई पाटील, भाजपच्या रेखा खेडेकर, शिवसेनेच्या कल्पना नरहिरे व काँग्रेसच्या मनिषा निमकर पहिल्यांदा आमदार झाल्या.१९९९ च्या निवडणुकीत महाराष्टÑात सत्तांतर झाले. या निवडणुकीत १९ पैकी १२ महिला निवडून आल्या तर सात पराभूत झाल्या. शालिनीताई पाटील या राष्टÑवादी पक्षाच्या तिकिटावर आणि सुलेखा कुंभारे या रिपाइंच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. भाजपमधून बाहेर पडलेल्या विमल मुंदडा राष्टÑवादी पक्षाकडून निवडून आल्या.२००४ च्या निवडणुकीत तब्बल १५७ महिला रिंगणात होत्या. परंतु प्रमुख पक्षांकडून १६ महिलांनाच उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी ११ महिला निवडून आल्या. या निवडणुकीत वर्षा गायकवाड धारावीमधून प्रथमच निवडून आल्या. याशिवाय अॅनी शेखर, सुलभा खोडके, अनुसया खेडकर, कमल ढोले-पाटील, रंजना कुल पहिल्यांदा आमदार झाल्या.
२००९ सालच्या निवडणुकीतील प्रमुख २० महिला उमेदवारांपैकी ११ महिला निवडून आल्या होत्या. त्यामध्ये तिवसामधून यशोमती ठाकूर, सोलापुरातून प्रणिती शिंदे, इगतपुरीतून निर्मला गावीत या काग्रेस पक्षाच्या उमेदवार पहिल्यांदा आमदार झाल्या. राष्टÑवादीच्या शामल बागल, भाजपच्या पंकजा मुंडे यांनी याच निवडणुकीत विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. पालघरमधून काँगे्रेसकडून तीनवेळा निवडून आलेल्या मनीषा निमकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली आणि त्या पराभूत झाल्या. भाजपच्या पूनम महाजन यांनाही घाटकोपरमधून पहिल्याच निवडणुकीत हार पत्करावी लागली.
२०१९ च्या निवडणुकीसाठी १८३ महिला उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख पक्षाकडून ६० महिला रिंगणात आहेत. सर्वाधिक २९ महिला उमेदवार या मुंबई व उपनगरात मिळून आहेत. तर ठाणे जिल्ह्यातून तब्बल २४ महिला उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर जिल्ह्यातून १७, पुणे आणि अमरावतीमधून प्रत्येकी १३, नाशिकमधून ११, रायगडमधून ९ तर नांदेडमधून ८ महिला उमेदवार रिंगणात आहेत. अकोला आणि चंद्रपूरमधून प्रत्येकी ६ तर अहमदनगर आणि यवतमाळमधून प्रत्येकी ५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. बुलडाणा, जळगाव, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातून प्रत्येकी चार तर गडचिरोली, सांगली आणि बीड जिल्यातून प्रत्येकी तीन महिला उमेदवार रिंगणात आहेत. परभणी आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर उस्मानाबाद, नंदुरबार, वाशिम,सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर,गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातून एकेक महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.३३ लाख महिला मतदार वाढले : राज्यात एकूण ८ कोटी ९४ लाख मतदार असून त्यापैकी ४ कोटी ६७ लाख पुरुष तर ४ कोटी २७ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षात (२०१४ ते २०१९) राज्यातील महिला मतदारांच्या संख्येत तब्बल३३ लाखांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे.या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिकजिल्हा पुरुष महिलारत्नागिरी ६२७७९३ ६८२७५२सिंधुदुर्ग ३३३७४० ३३६८४३गोंदिया ५४४६१९ ५५१८२०