ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.5 - मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा' बंगल्यावर बोलावलेली सर्वपक्षीय बैठक संपली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात 13 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे, यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावरुन राज्यातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणांसदर्भातील हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.
या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. याशिवाय मराठा आरक्षण समितीचे सदस्यदेखील हजर होते.
सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली आहे. राज्यभरातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती.