मुंबई : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळासाठी सहा महिन्यात आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री मदन येरावार यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेवरील चर्चेला उत्तर देताना येरावार यांनी ही घोषणा केली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे विमानतळ उभारण्याचा निर्णय घेऊनही पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची लक्षवेधी शरद रणपिसे, अनंत गाडगीळ आदींनी आणली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना येरावार म्हणाले की, प्रस्तावित विमानतळासाठी पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे १८०० हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या विमानतळामुळे सुमारे दीड लाख रोजगार उपलध होणार असून विस्थापितांना योग्य मोबदला दिला जाईल. २०१४-१५ च्या तुलनेत २०१५-१६ सालात विमान प्रवाशांमध्ये २९ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण आणि राज्य शासनाने गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण (मुंजेवाडी), पारगांव मेमाणे ( भोसलेवाडी), राजेवाडी, ताम्हणेवाडी, नायगाव ( राजूरी - रिसेपिसे) कोलविरे नव्हाळी या सहा ठिकाणी पाहणी केली होती. त्यापैकी मुंजेवाडी - पारगांव मेमाणे ( साईट १ ए) ता. पुरंदर या गावातील एक ठीकाण विमानतळ विकासासाठी योग्य असल्याचे प्राथमिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणचे भू संपादन, वीज मार्ग आणि रस्ताबदल करण्याबाबत प्राथमिक स्तरावर माहिती देण्यात आली आहे. तसेच याठिकाणी विमानतळ विकसित करायचे झाल्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत तांत्रिक - आर्थिक व पर्यावरणात्मक अहवाल केंद्र सरकारला सादर करावा असेही प्राधिकरणाने कळविले होते. त्यानुसार हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करणे, तांत्रिक, आर्थिक व पर्यावरणात्मक अहवालासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, मिहान इंडिया लि., महाराष्ट्र विमानतळ विकास आदी सदस्य असतील.
सहा महिन्यात सर्व परवानग्या
By admin | Published: March 10, 2017 1:09 AM