पुणे : शहर आणि जिल्ह्यामध्ये २१ विधानसभा मतदारसंघ आहेत; मात्र कॅबिनेट मंत्री, महापालिकेतील गटनेते, शहराध्यक्ष, स्थायी समितीचे सदस्य, विधान परिषदेच्या उमेदवारीपर्यंत सर्व पदे कसबा विधानसभा मतदारसंघातच का, असा सवाल करणारी पोस्ट भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर फिरविली जात आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. महापालिकेतील भाजपाचे गटनेते गणेश बिडकर हे कसब्यातीलच आहेत. स्थायी समितीच्या सदस्य मुक्ता टिळक यादेखील याच मतदारसंघात येतात. भाजपाचे शहराध्यक्ष आता राहण्यासाठी कोथरूड मतदारसंघात गेले असले, तरी ते मूळचे कसब्यातीलच आहेत. विधान परिषदेसाठी नुकतीच कसब्यातील नगरसेवक अशोक येनपुरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महत्त्वाची पदे कसब्यात केंद्रित झाल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.आठही विधानसभा मतदारसंघांतून भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. पालिकेतील तसेच इतर पदे देताना सर्व विधानसभा मतदारसंघांना समान न्याय देण्यात यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे केली जात आहे. यासाठी सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात पोस्ट फिरविल्या जात आहेत. महापालिका निवडणुकीवर भाजपाने खूप लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेत भाजपा सत्तेपर्यंत पोहोचणार, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना वाटत आहे. (प्रतिनिधी)
सर्व पदे कसबा मतदारसंघातच का?
By admin | Published: November 05, 2016 12:54 AM