रत्नागिरी : बेदखल कुळे, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, आरक्षण यांसह कुणबी समाजाच्या सर्वच प्रश्नांसाठी मंत्रालयात एक बैठक घेऊन ते प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी दिले. शामराव पेजे यांचे लोकोपयोगी स्मारक उभारण्यासाठी शामराव पेजे न्यासाला पाच कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली.शामराव पेजे स्मृती न्यासातर्फे लोकनेते शामराव पेजे यांचा जन्मशताब्दी महोत्सव वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, क्रीडा व शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार राजन साळवी, उदय सामंत, नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड, गोव्याचे माजी मंत्री प्रकाश विळीत, कोकण विभाग आयुक्त तानाजी सत्रे, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे, विश्वनाथ पाटील, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भूषण बरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.अण्णांनी कोकणातील गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांच्या उन्नत्तीसाठी अभ्यास करून अहवाल सादर केला. त्यांच्या अहवालावर सभागृहात चर्चादेखील झाली. १९८२पासून आतापर्यत ४१पैकी केवळ तीन शिफारसींवर चर्चा झाली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेदखल कुळांचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयस्तरावर तातडीने बैठक आयोजित करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शासनाने ओबीसी महामंडळांतर्गत शामराव पेजे मंडळाला १५ कोटीचा निधी यापूर्वीच दिला आहे. मात्र, भविष्यात हा निधी वाढण्याबाबत प्रयत्न करू, असेही आश्वासन त्यांनी दिले. जलसंधारण व लघु पाटबंधारेच्या माध्यमातून कोकणात अधिक काम झाले पाहिजे. कोकणातील चार नद्या पुनरूज्जीवित करण्यात येणार असल्याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कोकणातील या सर्वात आर्थिक दुर्बल समाजाची दखल घेण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे मांडली. कुणबी समाजाचे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये एखादी बैठक घ्यावी आणि त्या बैठकीला सर्व कुणबी संघटना प्रतिनिधींना बोलवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शामराव पेजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात न्यासाचे अध्यक्ष अॅड. सुजित झिमण यांनी प्रलंबित प्रश्नांवर उहापोह केला. बेदखल कुळांचे प्रश्न, आर्थिक विकास महामंडळांतर्गत उपकंपनी म्हणून स्थापन झालेल्या शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता व निधी मिळावा, कुणबी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.आमदार उदय सामंत यांनी न्यासातर्फे करण्यात आलेल्या सर्व मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगून शामराव पेजे यांचा आदर्श पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. देवदत्त वालावलकर यांनी केले. (प्रतिनिधी)चिमटे : फडणवीस यांचा सामंत यांना शालजोडीतला टोलाशामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ हे २00९मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूने स्थापन करण्यात आले होते, असे उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले. तो धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी ‘सामंत तेव्हा तिकडे होते, त्यामुळे आतल्या गोष्टी त्यांनाच माहिती आहेत’, असे सांगत चांगला चिमटा काढला.हिशोबात पक्केपेजे यांच्या १९९२ आणि १९९४ साली झालेल्या स्मृतिदिनांना त्या-त्या वेळेचे मुख्यमंत्री उपस्थित होते. ९२च्या देणगीत ९४ साली पाचपट वाढ झाली. आता १२ वर्षांनी त्याच प्रमाणात वाढ व्हावी, या अपेक्षेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘तेव्हा १८ टक्के व्याजदर होता, आता ८ टक्के आहे.’शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आमदार राजन साळवी यांना करून दिली व्यासपीठावर जागा.कुणबी समाजातील सर्व गटांचे प्रमुख व्यासपीठावरउशीर झाल्यामुळे विनोद तावडे बोललेच नाहीत.
कुणबी समाजाचे सर्व प्रश्न सोडवणार : देवेंद्र फडणवीस
By admin | Published: January 18, 2016 12:47 AM