नवी मुंबई : महापालिका शिक्षण मंडळाने स्वत:चे संकेतस्थळ सुरू केले आहे. शहरातील पालिका व खाजगी अशा सर्व ४५९ शाळांची माहिती व ठिकाण एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आरटीईअंतर्गत कोणत्या शाळेमध्ये किती जागा उलब्ध आहेत, याचा तपशीलही देण्यात आला असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळाने खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण दिले जात आहे का, शासनाच्या नियमांचे पालन केले जात आहे का, यावरही लक्ष केंद्रीत केले आहे. नवी मुंबई एज्युकेशन हब असले तरी नक्की कुठे व कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा हे पालकांच्या लक्षात येत नाही. यामुळे शिक्षण मंडळाने एनएमएमसीईडीयू नावाने स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर दिघा ते बेलापूरपर्यंतच्या सर्व ४५९ शाळांचा तपशील देण्यात आला आहे. शासनाने आरटीईअंतर्गत प्रत्येक खासगी शाळांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. परंतु कोणत्या शाळेत किती जागा आहेत याची माहितीच पालकांना मिळत नाही. यामुळे आरटीईच्या कक्षेत येणाऱ्या सर्व १०८ शाळांचे नाव, संपर्क क्रमांक व त्या शाळांमध्ये किती जागा आरक्षित आहेत याची सविस्तर माहिती शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. आयुक्त दिनेश वाघमारे व शिक्षण मंडळ उपायुक्त अमरीष पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संकेतस्थळ सुरू केले असून सोमवारी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आयोजित कार्यक्रमात औपचारिक सादरीकरण करण्यात आले. >शिक्षण विभागामध्ये शाळा, पालक, शिक्षक व विद्यार्थी हे चार महत्त्वाचे घटक आहेत. त्या सर्वांना उपयोग होईल अशाप्रकारची माहिती संकेतस्थळावर दिलेली आहे. शहरात नवीन येणाऱ्या नागरिकांना मुलांना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा हेही घरबसल्या पाहात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका व इतर सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे. - अमरीश पटनिगिरे, उपआयुक्त, शिक्षण मंडळ
सर्व शाळांची माहिती संकेतस्थळावर
By admin | Published: April 26, 2016 3:14 AM