कोल्हापूर : राज्यसभेत रविवारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी, ही विधेयके मंजूर करण्यात आली. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेला जबरदस्त टोला लगावला आहे. 'शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होत असताना 'जाणता राजा' म्हणवणारे शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी उपस्थित राहत नाहीत. तर शिवसेना लोकसभेत ज्या विधेयकांना पाठिंबा देते, त्याच विधेयकांना राज्यसभेत विरोध करते. हा सगळाच सावळा गोंधळ आहे. यांना शेतकऱ्यांच्या हिताची परवा नाही. यांना स्वार्थ अधिक महत्त्वाचा वाटतो," असे पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेला एका दिवसात काय साक्षात्कार झाला? -पाटील म्हणाले, संसदेत मंजूर झालेली ही विधेयके ही शेतकऱ्याच्या हिताची आहेत. मात्र, तरीही राजकीय विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने या विधेयकांना सभागृहात विरोध केला. शिवसेनेने तर या विधेयकांना पहिल्या दिवशी लोकसभेत पाठिंबाही दर्शवला होता आणि दुसऱ्या दिवशी मात्र राज्यसभेत विरोध केला. त्यांना एका दिवसात असा काय साक्षात्कार झाला? असा सवालही पाटील यांनी यावेळी केला. एवढेच नाही, तर खुद्द काँग्रेसनेच २०१९च्या निवडणूक जाहीरनाम्यात हा विषय मांडला होता. याची आठवण करून देत, मग ते आता या विधेयकाला विरोध का करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला.
...म्हणून अकाली दलाने केला विरोध -पंजाबमधील अकाली दलासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, पंजाबमध्ये बहुसंख्य बाजार समित्यांवर अकालीदलची सत्ता आहे. ही सत्ता जाऊ नये, म्हणून अकाली दलाने या विधेयकांना विरोध केला आहे. या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य कुटुंबातूनआले आहेत. त्यांना शेतकर्यांच्या समस्यांची जाण आहे. ते शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे, असेही पाटील म्हणाले.
कंगनाने शब्द जपून वापरावेत -कंगना रणौतसंदर्भात बोलताना पाटिल म्हणाले, शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगना राणौतच्या मताशी आपण सहमत नाही. मात्र, अनेक वेळा तिची भूमिका योग्य असते, पण ती मांडण्याची पद्धत चुकीची आहे. तिने शब्द जपून वापरावेत, कुणाच्या भावना दुखावू नयेत. आपल्या बोलण्याने काय दुष्परिणाम होता, हे तिला कळत नाही, असेही पाटील म्हणाले.