महाड (जि. रायगड) : हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नसून ती संस्कृती आहे, ही संस्कृती जपण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी किल्ले रायगडवर केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने आयोजित ३३८ या शिवपुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यकमात ते बोलत होते.राजसदरेवर झालेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षपदी पालकमंत्री रवींद्र चव्हाण होते. आ. भरत गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पांडुरंग बलकावडे, दीपक टिळक, रघुराजे आंग्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देताना अंगात चैतन्य संचारते असे सांगून कार्यक्रमात जोशात सहभागी होताना होशही सांभाळा, असा सल्लाही भागवत यांनी दिला.पुरस्कारांचे वितरण; विजेत्यांना पारितोषिकशिवभक्त प्रतिष्ठान, पंढरपूर यांना शिवस्मृती रायगड पुरस्कार तर दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांना (मरणोत्तर) विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे सरदार वीर कान्होजी जेधे यांचे वंशज जेधे कुटुंबीय आणि मेजर जनरल (निवृत्त) मनोज ओक यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडारोहण स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगड संवर्धनासाठी ६०० कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या काही वर्षांत रायगड किल्ल्याचे स्वरूप बदलल्याचे दिसून येईल, असा विश्वास पालकमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. सकाळी ५ वा. जगदिश्वराची पूजा झाल्यानंतर ६ वा. हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
हिंदू संस्कृती जपण्याचा सर्वांनी प्रयत्न करा- मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:27 AM