मुंबई : प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे. राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी धोबी तलाव येथील लॉर्ड हॅरिस महानगर पालिकेच्या शाळेत मांडले. याच वेळी तावडे यांच्या सहकार्याने २२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना धोबीतलाव येथील लॉर्ड हॅरिस महापालिका शाळेत दाखल करण्यात आले.बुधवारी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस आठवणीत राहावा, विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयीची गोडी वृद्धिगंत व्हावी, यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रथम’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने तावडे यांनी या निमित्ताने २२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना धोबीतलाव येथील लॉर्ड हॅरिस महापालिकेच्या शाळेत दाखल केले. विशेष म्हणजे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी फुलांनी सजवलेली बस मागवण्यात आली होती. मंत्रालय ते लॉर्ड हॅरिस महाविद्यालयापर्यंतचा बसप्रवास तावडे यांनी या विद्यार्थ्यांसोबतच केला. या प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. शिवाय शाळेतील अनेक गमती सांगितल्या. (प्रतिनिधी)शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक गेल्यास, गुणात्मक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. अधिकाधिक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवण्यासाठी साऱ्यांनीच दक्ष राहायला हवे, तरच मुलांना त्यांचा प्राथमिक शिक्षण मिळेल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री
सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार
By admin | Published: June 16, 2016 3:09 AM