मुंबई: आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, यात राष्ट्रीय आणि राजकीय मुद्दे होते. दरम्यान, या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचीही त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना के. चंद्रशेखर राव म्हणाले की, 'तेलंगाणाला वेगळे राज्य बनवण्यासाठी जे आंदोलन झाले, त्यावेळीस शरद पवारांनी पाठिंबा दिला होता. सर्वात आधी त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो. आपला देश सध्या अतिशय बेरोजगारीकडे जात आहे. बेरोजगारी आणि गरिबी वाढत आहे आणि विकास कमी होत आहे.'
'देशात खूप बदल करण्याची गरज आहे. या देशात बदल घडवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. याच अनुषंगाने आम्ही देशातील सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. देशातील जनता विरोधकांकडे खूप आशेने बघत आहे. आम्ही इतर पक्षांशी चर्चा करुन आणि एक चांगला अजेंडा घेऊन पुन्हा तुमच्यासमोर येऊ. शरद पवारांसोबत याच मुद्द्यांवर चर्चा झाली, हेच विचार मी त्यांच्यासमोर ठेवले, अशी माहिती केसीआर यांनी दिली.
अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली- शरद पवारयावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'आजची बैठक वेगळ्या विषयावर होती. बैठकीत राजकीय चर्चा फार झाली नाही. देशातील बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे इतर मुद्दे. यातून बाहेर कसे पडता येईल, यावर आज चर्चा झाली. आता आम्ही इतर विरोधी पक्षांशी चर्चा करणार आहोत, यानंतर सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर आम्ही एक संयुक्त बैठक घेऊन आमचा अजेंडा मांडू, अशी माहिती शरद पवारांनी दिली.