अमरावती - इंडिया आघाडीत रोज एक नेता उठतो आणि स्वत:ला पंतप्रधान म्हणून प्रमोट करतो. २८ पक्षातील नेते मग नीतीश कुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी हे प्रत्येक दिवस मनातल्या मनात पंतप्रधान झालेत. पण जेव्हा त्यांना कळतं, आपलं इथं काही होणार नाही तेव्हा एक एक करून ते बाहेर पडतील असा टोला शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी इंडिया आघाडीला लगावला आहे.
अभिजीत अडसूळ म्हणाले की, लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जागावाटप करावे लागेल त्यावरून इंडिया आघाडीत पुन्हा भांडणे होणार आहेत. शेवटी काँग्रेस ही एकमेव त्या आघाडीत राहणार आहे. अमरावती मतदारसंघावर आम्ही दावा करतोय. २० फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल. अमरावतीत नवनीत राणा यांनी खोटी प्रमाणपत्रे देऊन निवडून आल्यात. जर सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही तर कदाचित अशा राखीव जागेवर बोगस प्रमाणपत्रे देऊन असे लोक उभे राहतील. मग अन्याय झालेले लोक सुप्रीम कोर्टाविरोधात भाष्य करतील असं त्यांनी म्हटलं.
अमरावती मतदारसंघावर शिवसेनेचा दावा
सर्व पक्षांचा विरोध, प्रहारचे २ आमदार, शिवसेनेचा विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीही विरोधात अशी खासदार नवनीत राणा यांची परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात नवनीत राणांना विरोध वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला शिवसेनेलाच तिकीट मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत असं शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी सांगितले.