मुंबई - भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेते असताना मजल दर मजल करत देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांना अल्प मतात का होईना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपण पुन्हा येईल ही घोषणा खरी ठरवली होती. परंतु, राज्यात झालेल्या राजकीय भुकंपामुळे ज्याप्रमाणे भाजपचे इतर नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून बाहेर गेले, तसच काहीसं आता फडणवीस यांच्यासोबतही झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षाने राज्यात 2014 मध्ये सत्ता मिळवली. अनेक दिग्गज नेत्यांनी वर्षानुवर्षे दिलेल्या लढ्यानंतर भाजपला आपला मुख्यमंत्री विराजमान करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नेते इच्छूक होते. मात्र मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडली. फडणवीसांच्या पाच वर्षांच्या काळात भाजपमधील मुख्यमंत्रीपदासाठीचे सर्व इच्छूक हळूहळू गायब झाले आणि केवळ फडणवीस उरले होते. मात्र शिवसेनेची आक्रमक भूमिका आणि पवारांची खेळी यामुळे केवळ फडणवीसच नव्हे तर भाजपही सत्तेतून बाहेर फेकले गेले. 2014 पूर्वी भाजपकडून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर कन्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक होते. मात्र भाजप नेतृत्वाने फडणवीस यांनाच झुकते माप दिले. तेव्हापासून भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत लागली होती. मात्र 2019 येईपर्यंत हे सर्वच नेते शर्यतीत मागे पडले. तर चंद्रकांत पाटील यांच नाव पुढं आलं. मात्र 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी पाटील यांना रोखून धरत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळविण्यात बाजी मारली. मात्र त्यांची दुसरी टर्म आठ दिवसही चालू शकली नाही. ज्यांच्यामुळे नवीन सरकार घाईघाईने स्थापन करण्यात आले, त्या अजित पवारांनीच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि फडणवीसांचे स्वप्न भंग झाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भरवशावर भाजपशी हात मिळवली केली होती. मात्र आमदार सोबत राहिले नसल्याने भाजप सरकार कोसळले. अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद आता कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'या' सर्व नेत्यांसह अखेर फडणवीसही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 5:22 PM