शरद पवारांचे सर्व दौरे तुर्तास रद्द; पक्षबांधणीसाठी करणार होते महाराष्ट्र दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:33 AM2023-07-07T10:33:24+5:302023-07-07T10:34:21+5:30
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता
मुंबई – राष्ट्रवादीतील दुफळीनंतर शरद पवार यांनी पक्षसंघटना बांधणीसाठी राज्यभरात दौरे करणार असल्याचे जाहीर केले. अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट दिली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. लवकरच राज्यात दौरा करणार असल्याचे पवारांनी सांगितले होते. परंतु तूर्तास शरद पवारांचे दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. कारण पक्षसंघटना बांधणीसोबत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शरद पवार त्यांच्याशी काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु राज्यात पावसाचे वातावरण असल्याने सध्यातरी नजीकच्या काळातील दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत. शरद पवारांच्या दौऱ्याचे नियोजन करावे लागेल. त्यानंतर माहिती माध्यमांना दिली जाईल असं राष्ट्रवादीकडून कळवण्यात आले आहे.
अजित पवार आणि समर्थक आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले होते. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ नये यासाठी पवार प्रयत्नशील होते. त्यात शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्रात दौऱ्याचे नियोजन केले होते. नाशिक, धुळे, जळगाव याठिकाणी पवारांच्या सभा होत्या परंतु येवल्याची सभा वगळता पुढील दौऱ्यात बदल करण्यात आला आहे.
अजित पवारांनी दिलं होतं आव्हान
अजितदादांनी दिग्गज राष्ट्रवादी नेत्यांसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी शड्डू ठोकला होता. पवारांची पहिली सभा दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावात होणार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ५ जुलैच्या बैठकीत सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी यावर उघडपणे भाष्य केले. वळसे पाटलांनी हा मतदारसंघ पूर्वीपासून बांधून ठेवला आहे. तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी जाऊन सभा घेणार असाल तर मलाही बोलता येते. माझेही लोक ऐकतात, जर तुम्ही काही बोलला तर मलाही बोलावे लागेल. जर नाही बोललो तर माझ्यात काहीतरी खोट आहे असं लोकांना वाटेल. त्यामुळे तुमच्या सभा होतील तिथे ७ दिवसांनी मलाही सभा घेऊन लोकांना उत्तर द्यावे लागेल असं आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले होते.