मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 38 जण रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व निवडणुकाही पुढील तीन महिने स्थगित करण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोनाविषयी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजेश टोपे यांच्या उपस्थित सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 38 वर पोहोचला आहे. परदेशातून आलेल्या 12 रुग्णांमुळे इतर लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता कोरोंटाईन केलेल्यांवर निळ्या शाईचे शिक्के मारण्यात येणार आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
याचबरोबर, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, दहावी-बारावी परीक्षा ठरल्यावेळेनुसार होणार आहेत. याशिवाय, सर्व निवडणुकाही पुढील तीन महिने स्थगित करण्यात याव्यात, अशी विनंती निवडणूक आयोगाला करण्यात आला आहे. तसेच, राज्यात 100% शट डाऊन नाही. मात्र, शाळा आणि महाविद्यालये आता संपूर्ण राज्यभरात बंद करण्यात आली आहेत. मंत्रालयामध्ये सामान्यांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 38 झाली आहे. यामध्ये पुणे 16, मुंबई 8, ठाणे 1, कल्याण 1, नवी मुंबई 2, पनवेल 1, नागपूर 4, अहमदनगर 1, यवतमाळ 3 आणि औरंगाबादमध्ये 1 एक रुग्ण आहे.