मुंबई : लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेटिव्ह आणि मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सयद झैबुद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदालवर बुधवारी सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले. या वेळी २६/११ मुंबई हल्ल्याप्रकरणी आपण निर्दोष असल्याचे अबूने न्यायालयाला सांगितल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.अबू जुंदालला बुधवारी न्या. जी. ए. सानप यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्या. सानप यांनी जुंदालवर कोणते आरोप निश्चित केले आहेत? त्या अंतर्गत शिक्षेची काय तरतूद आहे, हे जुंदालला समजावून सांगितले. त्यावर जुंदालने तो निर्दोष असल्याचे न्या. सानप यांना सांगितले. कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध छेडणे, हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, हत्येसाठी अपहरण करणे, फसवणूक करणे, पाकिस्तानात बसून भारतावर दहशतवादी हल्ला करणे असे आरोप जुंदालवर निश्चित करण्यात आले आहेत. आयपीसीशिवाय जुंदालवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा, रेल्वे कायदा, कस्टम कायदा, एक्सप्लोझिव्ह अॅक्ट, एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स अॅक्ट व सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याबद्दलही आरोप ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानी-अमेरिकन लष्कर-ए-तोयबाचा सदस्य डेव्हिड हेडली यालाही या खटल्यात आरोपी करण्याच्या पोलिसांच्या अर्जावर युक्तिवाद करण्यात येईल, असेही अॅड. निकम यांनी सांगितले. हेडलीला व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यासंदर्भात पोलिसांनी न्यायालयाला अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायालयाने ८ आॅक्टोबर रोजी अमेरिकेला ‘लेटर आॅफ रिक्वेस्ट’ पाठविले होते. जुंदालवर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी जुंदालच्या पाकिस्तानातील अतिरेकी प्रशिक्षणापासून ते २६/११ च्या हल्ल्याची योजना कशी आखण्यात आली इत्यादीची माहिती नमूद करण्यात आली आहे. जुंदालने त्याच्या कबुलीजबाबात पाकिस्तानच्या एलईटी ट्रेनिंग कॅम्पला, स्थानिकांपासून तेथील पोलिसांचे आणि निमलष्करी संघटनाचे कशाप्रकारे समर्थन आहे, याबद्दलची सर्व माहिती पोलिसांना दिली. तो औरंगाबादमधील शस्त्रसाठा प्रकरण, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट आणि नाशिक पोलीस अॅकॅडमीवर केलेल्या हल्ल्याप्रकरणीही आरोपी आहे. (प्रतिनिधी)
२६/११ हल्ला प्रकरणातील अबू जुंदालवरचे आरोप निश्चित
By admin | Published: November 05, 2015 3:02 AM