मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी व संजीव खन्ना यांच्यावर मंगळवारी हत्येचा आरोप निश्चित केला. १ फेब्रुवारीपासून खटल्यास सुरुवात होईल.त्यांच्यावर हत्येचा कट, हत्या, अपहरण, गुन्ह्याबद्दल चुकीची माहिती आणि पुरावे नष्ट करणे आदी गुन्ह्यांखाली विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले. इंद्राणी व संजीववर मिखाईलची हत्या करण्यासाठी कट व त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचाही अतिरिक्त आरोप निश्चित करण्यात आला.इंद्राणीने मद्यामध्ये विष मिसळून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले होते. इंद्राणीवर बनावट कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा खरे कागदपत्र म्हणून वापर करणे हा आरोप निश्चित करण्यात आला. तिघांनी न्यायालयात आरोप अमान्य केले. पीटरचा मुलगा राहुलबरोबर शीनाचे प्रेमसंबंध होते. त्यातून तिची हत्या करण्यात आली, असा युक्तिवाद सीबीआयने केला आहे. प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या देखरेखीखाली सुरू होता. मात्र त्यानंतर तो सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. तपासात कोणाचाही हस्तक्षेप होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>इंद्राणीला हवा घटस्फोटपीटरने गुन्ह्यांचे खापर इंद्राणीवर फोडून प्रकरणातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. सुनावणीतही पीटर हे इंद्राणीवरच जबाबदारी ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंद्राणीने पीटरपासून घटस्फोट मिळण्याची विनंती विशेष न्यायालयाला केली. त्यावर तुम्ही दोघांनीच हे ठरवा, असे न्यायालयाने सांगितले.>ड्रायव्हर माफीचा साक्षीदारइंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने सरकारी वकिलांचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने त्याला ‘माफीचा साक्षीदार’ जाहीर केले.
इंद्राणी, पीटरविरुद्ध शीनाच्या हत्येचा आरोप
By admin | Published: January 18, 2017 6:32 AM