पणजी : लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीकडून चर्चिल आलेमाव यांनी दोन हप्त्यांत, तर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दोन हप्त्यांत लाच घेतल्याची माहिती क्राईम ब्रँचने पणजी विशेष न्यायालयात दिली. बुधवारी अटक केल्यानंतर गुरुवारी चर्चिल यांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.बुधवारी रात्री उशिरा एखाद्या लहान मुलाला फसवून आणावे, तसे नाट्यमयरीत्या चर्चिल यांना बोलावून घेऊन क्राईम ब्रँचमध्ये आणण्यात आले आणि रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक केली होती. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता त्यांना विशेष न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात आले. त्यांनी लाचखोरी केल्याचे ठोस पुरावे क्राईम ब्रँचकडे असून सध्या या प्रकरणाचा प्राथमिक तपास झाला आहे. चर्चिल हे तपासकामात सहकार्य करीत नसल्यामुळे त्यांची १२ दिवसांची कोठडी क्राईम ब्रँचला हवी असल्याचे सरकारी वकील जी.डी. किर्तनी यांनी न्यायालयाला सांगितले.चर्चिल यांचे वकील अरुण डिसा यांनी पोलिसांच्या दाव्याला हरकत घेतली. चर्चिलना ज्या ज्या वेळी चौकशीला बोलावण्यात आले होते, त्या वेळी ते क्राईम ब्रँचमध्ये हजर राहिले होते. त्यामुळे मध्यरात्री उशिरा त्यांना भेटायला बोलवून अटक करण्याची काहीच गरज नव्हती, असा त्यांनी दावा केला.क्राईम ब्रँचकडून करण्यात आलेली १२ दिवस रिमांडची मागणी न्यायालयाने मंजूर केली नाही; परंतु चार दिवसांचा रिमांड मंजूर केला. तर, दिगंबर कामत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
आलेमाव ४ दिवस पोलीस कोठडीत
By admin | Published: August 07, 2015 1:15 AM