लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना युती सत्तेवर येऊ शकते, असे भाकीत शिवसेनेचे नेते व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी येथे केले.
अब्दुल सत्तार दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी भाजपसाेबत युती शक्य असल्याचे विधान करून पुन्हा नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करीत असतात. असे असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपसाेबत पुन्हा संसार मांडण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नितीन गडकरी यांच्याविषयी शिवसेनेच्या सर्वाेच्च नेत्यांच्या मनात चांगलीच भावना आहे. त्यामुळे गडकरी यांनी पुढाकार घेतल्यास शिवसेनेशी भाजपचे असलेले मतभेद दूर हाेऊ शकतील, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.
‘रश्मी ठाकरे चांगल्या मुख्यमंत्री ठरतील’रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले तर त्यासाठी कुणाचीही हरकत राहणार नाही, असेही अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखविले. सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याला काेणाचीही हरकत नसल्याच्या विधानाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजाराचा मुद्दा पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चिला जाण्याची शक्यता आहे.