ठाणे : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. त्याकरिता महाविकास आघाडीतील सर्वपक्षांना त्यांनी सबुरीचा सल्ला दिला.काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. थोरात म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. दुर्दैवाने केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही, कॉंग्रेसच्या काळात एक रुपयाची जरी इंधन दरवाढ झाली तरी भाजपकडून आंदोलन केले जात होते. आता भाजपचे कार्यकर्ते लपून बसले आहेत का? त्यांचा शोध घेण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ईडीसारख्या यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर सुरू असल्याचे आता लहान मुलांनासुद्धा समजायला लागले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे चौकशी होत नसल्याने शांत झोप लागते, असे विधान केले होते. त्याचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, पाटील यांचे हे विधान भाजपमधील नेत्यांवर कारवाई होत नसल्याचा स्पष्ट पुरावा आहे. राज्यातील सरकार कमकुवत करण्याचे, पाडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी भक्कम आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासलेराधाकृष्ण विखे-पाटील यांनी आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे जे वक्तव्य केले त्यामुळे त्यांची कीव येते. विखे हे शपथविधीचे स्वप्न पाहत होते, नवीन कपडेही त्यांनी शिवले होते, आज ना उद्या सरकार पडेल, असे त्यांना वाटत होते, परंतु मनाजोगे काही होत नसल्याने विखेंना नैराश्य आले आहे. त्यामुळे ते बेताल वक्तव्ये करीत असल्याची टीका थोरात यांनी केली.
पालिका निवडणुकांतही भाजपविरोधात आघाडी- बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 9:42 AM