मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पुन्हा महायुती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र असे असलेही तरीही, दीड महिन्यांचा कालवधी उरला असतानाही दोन्ही पक्षातील जागावाटपाचा निर्णय अजूनही होऊ शकला नाही. त्यामुळे मित्र पक्षांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे. जर भाजप- सेना सोबत लढली तर निश्चितच याचा फायदा मित्र पक्षांच्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीत युती करतांना मित्र पक्षांना सुद्धा काही जागा देण्याचे भाजप-सेनेत आधीच ठरले आहेत. मात्र कुणाला किती जागा द्यायच्या या बाबतचा खुलासा अजूनही होऊ शकला नाही. मात्र रासप प्रमुख आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी किमान १४ जागा आपल्याला सोडाव्यात अशी मागणी केली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा १० जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी १२ तर आमदार विनायक मेटे यांनी सुद्धा १२ जागा देण्याची मागणी केली आहे.
भाजप-शिवसेनेत एकीकडे युतीची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेते आमची स्वबळाची तयारी सुद्धा झाली असल्याचे वक्तव्य करत असल्याने ऐनवेळी युती फिसकटली जाणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र युती जर फिसकटली तर याचा फटका मित्र पक्षांना सुद्धा बसण्याची शक्यता असल्याने, मित्र पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. जर युती झाली तर निश्चितच याचा फायदा सुद्धा मित्र पक्षाच्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे युती व्हावीच अशी अशा मित्र पक्षांच्या नेत्यांना लागली आहे.