- लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शिवसेना-भाजपाचे सरकार म्हणजे, गावात येणारा काळू-बाळूचा तमाशा आहे. हे सरकार एक नौटंकी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे, हे अनेक उदाहरणांतून दिसून आले आहे. साखर मुबलक असतानाही पाच लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेची आयात असो की, तूर पिकवायला सांगून खरेदी न करणारे सरकार असो. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करायची, प्रत्यक्षात खरीप संपत चालला, तरी एक रुपयाही द्यायचा नाही, हीच सरकारची भूमिका आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारला शेतकरी देशोधडीला लावेल. दुर्दैवाने सरकारमध्ये असलेल्यांना शेतीचे काय कळते, असे म्हटले, तर त्यांना मिरच्या झोंबतील, असे त्यांनी सांगितले.‘समृद्धी’वरून टीकाशिवसेनेचे मंत्रिमंडळात बारा मंत्री आहेत, त्यांना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाची बैठक गाजवायला सांगा. समृद्धी महामार्गाचा विषय असो की, राष्ट्रपतिपदाची निवडणूक, उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात दुसरेच. त्यांचेच मंत्री एकनाथ शिंदे नागपुरात जाऊन समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांशी करार करतात, अशी टीका अजित पवार यांनी केली.हे सरकार गावा-गावांत येणाऱ्या काळू-बाळूच्या तमाशासारखे आहे. एकाने मारल्यासारखे करायचे अन् दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे. १५ वर्षांनंतर यांची सत्ता आली आहे. ते मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणार नाहीत.- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री