मुंबई : आघाडी सरकारच्या काळात पुरवणी मागण्यांवर टीका करणाऱ्या भाजपालादेखील पुरवणी मागण्यांचाच आधार आज घ्यावा लागला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल १४ हजार ७९३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत सादर केल्या. अलीकडील काळात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांपेक्षा यंदाच्या मागण्या सर्वाधिक आहेत. स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करताना होणारी हानी भरून काढण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २५ महापालिका क्षेत्रात वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना १ आॅगस्टपासून सूट देण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे महापालिकेला एलबीटीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल. ही आर्थिक हानी भरून काढण्यासाठी २ हजार ९८ कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. सत्तेत आल्यास एलबीटी रद्द करू, असे आश्वासन भाजपाने दिले होते. २०१५-१६चा अर्थसंकल्प मांडतानादेखील याचा पुनरुच्चार करण्यात आला होता. मात्र आजच्या पुरवणी मागण्यांवर नजर टाकली असता महापालिका क्षेत्रातून एलबीटी संपूर्णत: हटविली जाणार नाही, असे स्पष्ट होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष साजरे करण्यासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच त्यांचे लंडनमधील घर खरेदी करण्यासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सर्व शिक्षा अभियानासाठी २७६ कोटी, स्वच्छ भारत अभियानासाठी १७७ कोटी, राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी ४७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी) बुलेटप्रूफ गाड्यांसाठी १ कोटी ४० लाख रु.राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नवी दिल्लीतील भेटीसाठी दोन नवीन बुलेटप्रूफ गाड्या खरेदी करण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठीचा खर्च भागविण्याकरिता १० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
युती सरकार पुरवणीवर !
By admin | Published: July 14, 2015 12:29 AM