मुंबई - लोकसभा निवडणुका संपताच आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी जगतापांचा मार्ग खडतर असणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मागच्यावेळी युती न झाल्याने भाजप-शिवसेनेच्या मतांमध्ये झालेल्या विभागणीमुळे जगताप यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी युती निश्चित मानली जात असल्याने जगताप यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
नगर शहर मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. कारण, २०१४ ची निवडणूक सोडली तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड सलग २५ वर्षे आमदार राहिले आहेत. मात्र गेल्यावेळी भाजप- शिवसेनेमध्ये युती झाली नसल्याने मंताची झालेली विभागणी जगताप यांच्यासाठी फायदेशीर ठरली आणि राठोड यांचा पराभव झाला. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे जगताप यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांना ४९ हजार ३७८ मते पडली होती. तर माजी आमदार राठोड यांना ४६ हजार ६१ मते मिळाली होती. त्यातच भाजपकडून रिंगणात उतरलेले अभय आगरकर यांना ३९ हजार ९१३ मते पडली होती. जर युती झाली असती तर आगरकर यांची मते राठोड यांच्या पदरात पडली असती आणि त्यांचा सहज विजय झाला असता. मात्र युती न झाल्यानेच राठोड यांना पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यावेळी युती होणार असल्याचे निश्चित समजले जात असून, त्यामुळे जगताप यांचा मार्ग खडतर असणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे जर जगताप राष्ट्रवादीतच राहिले तर राठोड यांची उमदेवारी निश्चित समजली जात आहे. तसेच यावेळी पुन्हा जगताप विरोधात राठोड असा सामना पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे.