नागपूर : लोकसभा निवडणुकीत राज्यात २८८ विधानसभा मतदार संघापैकी महायुतीला २४६ मतदार संघात आघाडी मिळाल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रपरिषदेद्वारे केला. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने लोकांचा विश्वास गमावलेला आहे. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनीच नव्हे तर सरकारनेच राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, अशी मागणी त्यांनी केली. फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची इतकी वाईट अवस्था कधीच झाली नाही. १९७७ मध्ये सुद्धा संपूर्ण देशाने काँग्रेसला नाकारले असताना महाराष्ट्राने त्यांची साथ दिली होती. परंतु या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे पानिपत झाले आहे. महायुतीला एकूण २ कोटी ५० लाख (५२.७१ टक्के) मते मिळाली आहेत. यामध्ये भाजपालाच १ कोटी ३३ लाख मते, तर शिवसेनेला १ कोटी मते मिळाली. काँग्रेसला ८८ लाख तर राष्ट्रवादीला ७७ लाख मते मिळाली. २००९ च्या तुलनेत भाजपाला दुप्पट मते मिळाली. भाजपाला १३३ तर शिवसेनेला १०१ मतदारसंघात आघाडी मिळाली. स्वतंत्र विदर्भाबाबत ते म्हणाले, विदर्भाचे आम्ही नेहमीच समर्थन केले आहे.
महायुतीला २४६ मतदारसंघात आघाडी
By admin | Published: May 19, 2014 3:20 AM