ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - विरोधीपक्षांच्या बाकावर बसलेली शिवसेना सत्तेत सहभागी होत असून शुक्रवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेचे १२ तर भाजपाचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. राज्यात यावेळी केवळ भाजपाचे सरकार नसून शिवसेना-भाजपाचे अर्थात युतीचे सरकार अस्तित्वात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता विधानभवनांच्या प्रांगणात शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. येत्या ८ डिसेंबरपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, त्यापूर्वी मंत्रिमंडळचा विस्तार करण्यात येत आहे. मुंबईतील विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱया कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव मंत्र्यांना पद आणि गोपनयीतेची शपथ देतील. शिवसेनेच्या पारडयात भाजप कोणती खाती टाकणार हे सध्या गुलदस्त्यात असले तरी महत्वाचे गृह, अर्थ, महसूल ही खाती देण्यास भाजपाने सेनेला आधीच नकार दिला आहे. शिवसेनेतून आता मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता असून कॅबिनेट मंत्रीपदासाठी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची नावे चर्चेत आहेत. तर राज्यमंत्री पदासाठी दादा भुसे, विजय आवटी, रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर किंवा उदय सामंत, दीपक सावंत यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेतही कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदाला मुकणार का, अशी शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचे जवळपास निश्चित झाले असून, या स्थितीत संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे येऊ शकते. मात्र विधीमंडळाच्या गेल्या अधिवेशनात कॉंग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून त्यांना विरोधीपक्षनेतेपदालाही मुकावे लागेल का, अशी शक्यता निर्माण झाली आहे.