मुंबई -लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपविरोधी भूमिका घेत मोठ-मोठ्या सभा घेतल्या होत्या. त्या सभांना गर्दीही झाली होती. त्यावेळी 'लाव रे तो व्हिडीओ' हे वाक्य फार गाजले होते. राज ठाकरेंचा हा स्टँड पाहून ते विधानसभेला आघाडीत येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र राज यांनी विधानसभेला आपले उमेदवार उभे केले. परंतु, काही मतदार संघात मनसेचे आघाडीसोबत साटं-लोटं झाल्याचे चित्र आहे.
मनसे आणि आघाडीत काही जागांवर साटं-लोटं होणार याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीतच दिले होते. राज ठाकरेंनी सोबत यावे ही आपली इच्छा असली तरी मित्र पक्षांना जपणे हेही महत्त्वाचे आहे. मात्र राज ठाकरे उत्तम वक्ते असून ते सोबत आल्यास आनंदच होईल, असंही ते म्हणाले होते.
दरम्यान, कोथरूड मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेच्या शिंदे यांना आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगत, चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आघाडी आणि मनसेने भाजपला रोखण्यासाठी ही लढत मैत्रीपूर्ण लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील कोथरूडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची परतफेड करण्याचं निश्चित केले आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेऊन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आपण माघार घेतल्याचे मुर्तडकर यांनी सांगितले. तर ठाण्यात मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे.