पुणे : महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यात सोमवारी सकाळी याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळाली. युती केली तर फायदा आहे व नाही केली तर तोटा, हे लक्षात ठेवून दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडावीत, असे ठरले असल्याचे समजते.त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा पालकमंत्री बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले व सेनेच्या बाजूने राज्यमंत्री शिवतारे, संपर्कनेते डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष विनायक निम्हण अशी एकत्रित बैठक होणार आहे. या दुसऱ्या फेरीत लगेचच जागावाटपाचा फार्म्युला ठरेल असे नाही; मात्र त्याचे मुद्दे निश्चितपणे पुढे येतील, अशी माहिती मिळाली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांना याची माहिती देऊन त्यांच्या संमतीने चर्चा पुढे नेण्यात येईल.भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की सेनेकडून वास्तवाचा स्वीकार करण्यात आला आहे. त्यांच्या जागा कमी असल्या तरीही भाजपाकडून त्यांचा सन्मान ठेवतच; पण राजकीय नुकसान होणार नाही, या पद्धतीनेच चर्चा केली जाईल. वेगवेगळे लढून अनेक ठिकाणी मनसे किंवा अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा फायदा होऊ शकतो. मागील निवडणुकीत यामुळेच मनसेला फायदा झाला. आता त्यांच्या कमी होणाऱ्या जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा डोळा आहे. या जागा पाहिजे असतील तर युती करावीच लागेल, अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षांतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्यामुळे आता स्वबळाचा नारा सोडून युतीची चर्चा सुरू झाली आहे असे समजते.सध्या ज्या जागा ज्यांच्याकडे आहेत त्या तशाच ठेवायच्या, यापूर्वीच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष होता, त्यांच्याकडे त्या जागा द्यायच्या, उर्वरित जागा समान वाटून घ्यायच्या, तत्पूर्वी कोठे कोणाची ताकद आहे, निवडून येण्याची शक्यता कोणाची अधिक आहे याचा विचार करायचा, असे एक सूत्र भाजपाकडून सेनेला दिले गेले असल्याची माहिती मिळाली. मात्र, यात सेनेच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याने त्यांच्याकडून दुसरा एखादा फार्म्युला पुढे आणला जाण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपाने त्याची तयारी ठेवली असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. (प्रतिनिधी) >एकमेकांचे प्रस्ताव दाखविणार : शिवसेना- भाजपची प्राथमिक चर्चा आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सायंकाळी भाजप व शिवसेना यांची संयुक्त बैठक झाली. त्यात ‘दोन्ही पक्षांनी जागावाटपाचा त्यांना हवा तसा प्रस्ताव तयार करावा व एकमेकांना दाखवावा’ असा निर्णय घेण्यात आला. आता व भविष्यातील राजकारणासाठीही दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे, त्यामुळे ‘युती करून निवडणूक लढविणे योग्य’ असे ठरल्यानंतर हा निर्णय झाला. जागावाटपाचा फार्म्युला त्यानंतर तयार करण्याचे ठरले. भाजपाच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले व शिवसेनेच्या वतीने मंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री शशिकांत सुतार, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष विनायक निम्हण हे बैठकीला उपस्थित होते. चर्चा सुरू झाली आहे. मंत्री विजय शिवतारे यांच्याशी बोलणी झाली; पण ती अगदीच प्राथमिक स्वरूपाची आहेत. आणखी काही बैठका होतील. युती होणे फायद्याचे आहे; पण प्रत्यक्ष निवडणूक जे लढणार आहेत त्यांची मतेही महत्त्वाची आहेत. ती जाणून घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय करण्यात येईल.- गिरीश बापट, पालकमंत्री
युती, आघाडीसाठी पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 1:13 AM