"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:10 PM2024-09-05T12:10:34+5:302024-09-05T12:11:38+5:30
महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महायुतीची सर्व सूत्रे केंद्रातून नियंत्रित होती. निकालावर आमच्या कोअर कमिटीतही चर्चा झाली. कारणांचा आढावा घेतला गेला. मतदारांनी का नाकारले हा खूप मोठा विषय आहे. वरिष्ठांनी त्यावर मंथन केले आहे. त्याचे मुद्देही काढले आहेत. ३ पक्षांचे महायुतीचे सरकार झाल्यामुळे असा निकाल लागला का यावर अनेकांनी मतमतांतरे आहेत. मात्र अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीत आल्याने ३५-४० विधानसभा मतदारसंघ आणि ५-६ लोकसभा मतदारसंघावर परिणाम झाला जिथं भाजपाची ताकद होती असा दावा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अजित पवारांसोबत आलेले आमदार आणि भाजपाचे तिथले उमेदवार यांच्यात बहुतांश ठिकाणी संघर्ष झालेला आहे. काही मतदारसंघात शिवसेनेशी संघर्ष असेल परंतु सर्वाधिक संघर्ष राष्ट्रवादीशी झाला. राष्ट्रवादीचे २०१९ मध्ये जे ५३ आमदार निवडून आले होते त्यातील बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातील होते. त्यात पुणे जिल्ह्यात ११ आमदार होते. त्यामुळे सहाजिकच तिथे लढत भाजपाशी झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतला हा फॅक्टर इतका दिसून आला नाही मात्र विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्यांना याचा विचार गांभीर्याने करावाच लागणार आहे असं त्यांनी सांगितले. मुंबई तकच्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच ही कोंडी सोडवणार कशी?, जसजशा निवडणूक छोटी होत जाते, तशी स्पर्धा वाढत जाते. आता लोकसभेत २२-२३ लाख मतदान असते, ६ विधानसभेचा समावेश असतो. विधानसभेत अडीच तीन लाख मतदान, १५०-२०० गावे, त्यात एखादी नगरपालिका किंवा महानगरपालिका येऊ शकते. त्यामुळे जेवढे स्थानिक पातळीवर निवडणूक येईल तेवढी स्पर्धा वाढते. आमच्या नेतृत्वाने विचार करावा अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, मते ट्रान्सफर करण्याची परिस्थिती आता राहिली नाही. प्रत्येक घरामध्ये मतदार कुणाला मत द्यायचे याचा विचार करतो. एक काळ असा होता, चावडीवर बसून कुणाला मतदान करायचे हा निर्णय व्हायचा, तो निर्णय लोक ऐकायचे परंतु आता तशी परिस्थिती नाही. महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही. आता तालुक्यात आमचं फिरणं सुरू आहे. लोकांचा प्रचंड आग्रह आहे तुम्ही लढलं पाहिजे. मतदार उघडपणे बोलायला लागला आहे. ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालावीच लागणार आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माणसं हेरण्याचा प्रयत्न करणारच आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.