राज्यात सत्तेत असलेले मित्रपक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आमने - सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 11:48 AM2020-12-16T11:48:57+5:302020-12-16T11:51:58+5:30
महाविकास आघाडीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची अडचण
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : मिनी विधानसभा म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील निम्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 748 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा रणसंग्राम सध्या जिल्ह्यात सुरू झाला आहे. परंतु राज्यात सत्तेत असलेले मित्रपक्ष जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. या महाविकास आघाडीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.
कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2020 अखेर पर्यंत मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यातील तब्बल 748 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. यासाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
राज्यात सरकारमध्ये मित्र पक्ष असलेलेचे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर एकमेकाचे कट्टर विरोधक आहे. यामुळे मात्र स्थानिक पातळीवर आमदार, खासदार, अन्य पदाधिकारी यांची चांगलीच अडचण झाली आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काही तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. यामध्ये
जुन्नर, आंबेगाव , खेड , पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना आमनेसामने आहेत. तर भोर , वेल्हा आणि मुळशी तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकाचे कट्टर विरोधक आहेत. तर शिरूर, मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत आहे. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात देखील राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान आहे. यामुळे गेले वर्षभर राज्यात सत्तेत एकत्र असलेले मित्र पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत आमनेसामने उभे राहणार असल्याने हा रणसंग्रामा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
--------
जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायती
खेड -91, भोर-73, शिरूर-71, जुन्नर-66, पुरंदर-68, इंदापूर-60, मावळ - 57, हवेली- 54, बारामती- 52, दौंड - 51, मुळशी - 45, वेल्हा - 31, आंबेगाव- 29, पिंपरी-चिंचवड- 1 , एकूण : 748
---------
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
- तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे : १५ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज दाखल करणे : २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर
- उमेदवारी अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : 4 जानेवारी 2021
- मतदान : 15 जानेवारी 2021
- मतमोजणी : 18 जानेवारी
-------
जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
पुणे जिल्ह्यात 1407 ग्रामपंचायती असून, यात बहुतेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर काही तालुक्यात शिवसेना, काँग्रेस आणि भाजपची देखील चांगली ताकद आहे.
------
महाआघाडीतील मित्रपक्ष जिल्ह्यात पारंपारिक विरोधक
राज्यात महाआघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पुणे जिल्ह्यात एकमेकांचे पारंपारिक विरोधक आहेत. तरी देखील अनेक वेळा ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक परिस्थितीवर निर्णय घेतला जातो. काही ठिकाणी महाआघाडीतील पक्ष एकत्र येऊ शकतात तर काही ठिकाणी भाजपला देखील बरोबर घेतले जाऊ शकते.