मुंबई : महाविकास आघाडी जागावाटपाबाबत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या प्रमुख नेत्याची बैठक बुधवारी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक घेतली. वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि काही जागांवर अडलेले जागावाटप याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली.
महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. त्यात नव्याने सामील झालेल्या वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे आघाडीची मोठी अडचण झाली आहे. वंचितला सोबत घेण्याबाबत पवार आणि ठाकरे दोघेही आग्रही असल्याने नेमक्या किती जागा त्यांना सोडता येतील याची चाचपणी सिल्व्हर ओकवरील बैठकीत करण्यात आल्याचे समजते. पवार यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. त्यामुळे उद्या होणाऱ्या चारही पक्षांच्या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला २३ जागा सोडण्यात येणार असून यामध्ये वंचितला जागा देण्यात येणार आहेत. ठाकरे गट २० जागा लढविण्याच्या तयारीत आहे. सर्व ४८ जागांचे वाटप लवकरात लवकर करणे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभांचे नियोजन यावर विस्तृत चर्चा या बैठकीत झाली.