मुंबई : देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का आणि तिन्ही घटकपक्षांमध्ये मंत्रिपदांचे वाटप कसे होईल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजप आणि शिंदेसेना या दोन मित्रपक्षांमध्ये गृह खात्याच्या वाटपासह काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे चित्र शनिवारी समोर आले. मंत्रिपदाच्या वाटपाबाबत अद्याप रु शकलेला नाही. भाजप व शिंदेसेना दोघांनाही गृह खाते हवे आहे.
शिंदेसेनेचे नेते आ. संजय शिरसाट पत्र परिषदेत म्हणाले की, गृहखाते कणखर नेत्याला मिळायला हवे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. आता मुख्यमंत्रिपद भाजपकडे जात आहे, तर अशावेळी उपमुख्यमंत्रिपद असलेल्या आमच्या पक्षाकडे गृहखाते असायला हवे. शिंदे महाराष्ट्रातच राहतील, असे सांगत शिरसाट यांनी शिंदे केंद्रीय मंत्री होणार असल्याची शक्यता फेटाळून लावली. दुसरीकडे फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडेच गृह खाते असायला हवे, यासाठी भाजप आग्रही
असल्याची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिरसाट यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, असे कुठल्या खात्याबाबत वा सरकारच्या रचनेबाबत माध्यमांमध्ये बोलून काहीही होत नसते. सरकारची स्थापना अशा पद्धतीने होत नसते. तीन पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून काय तो निर्णय घेतील.
शपथविधी ५ डिसेंबरला
■ मंत्रिमंडळाचा शपथविधी ५ डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर होईल, असे बावनकुळे यांनी एक्सवर जाहीर केले.
■ त्या आधी भाजप आमदार-खास- दारांच्या झूम बैठकीत बोलताना त्यांनी, तुमच्या मनात आहे तेच मुख्यमंत्री होतील, असे म्हणत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनाच नेता निवडणार
भाजपच्या आमदारांची विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठीची बैठक ३ डिसेंबरला दुपारी मुंबईत होणार आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही माहिती दिली. बावनकुळे यांनी सकाळी भाजप आमदार, खासदारांची झूम बैठक घेतली, त्यात त्यांनी नेता निवडीची बैठक २ डिसेंबरला होईल, असे सांगितले.
ही बैठक २ ऐवजी ३ डिसेंबरला होईल, असे नंतर आमदारांना कळविण्यात आले. बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड होईल हे निश्चित मानले जात आहे. त्यानंतर तिन्ही नेते राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करतील.
एकनाथ शिंदे यांना १०४ डिग्री ताप
■ काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. त्यांना १०४ डिग्री फॅरनहिट ताप असल्याचे समजते. सर्दी, खोकल्याचाही त्रास आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. त्यांची रक्त तपासणीही करण्यात आली. काळजीचे कारण नाही, त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक तैनात केले आहे, असे सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील वैद्यकीय रुग्णालयाचे शल्य- चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी सांगितले.
केसरकर न भेटताच परतले:
माजी मंत्री व शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दरे गावी गेले होते. मात्र, शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने ते न भेटताच मुंबईला परतले.